सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ३१ ऑगस्ट पूर्वी करा ऑनलाईन अर्ज

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३१ ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे केले आवाहन

Apply online before 31st August for Public Ganeshotsav Mandal Competition
Apply online before 31st August for Public Ganeshotsav Mandal Competition

मुंबई : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा (Ganeshotsav Mandal Competition) आयोजित करण्यात येत असून उत्कृष्ट मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येतो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर (ता. ३१) ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे,असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०२४ च्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. (ता. ७ ) सप्टेंबर पासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२४ अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येक तीन व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम पुरस्कार ५ लक्ष रुपये, द्वितीय अडीच लक्ष रुपये, तृतीय  १ लक्ष रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उर्वरित ४१ जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना  प्रत्येकी  २५ हजार रुपयांचे पारितोषिक  व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

धर्मादाय आयुक्त यांच्या कडे नोंदणी असलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतलेल्या  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यात सहभाग घेता येईल. www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.३१ जुलै २०२४ च्या शासननिर्णयात स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इच्छुक मंडळांनी दि. ३१ ऑगस्ट पर्यंत आपले अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर सादर करावे,असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

 या स्पर्धचे आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देईल. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करण्यात येतील. निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असेही कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here