विनोद तावडेंना तात्काळ अटक कराः रमेश चेन्नीथला

पराभवाच्या भितीने भाजपाकडून राज्यभरात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाने तावडेंसह भाजपावरही कारवाई करावी

Congress Maha Vikas Aghadi will form government with a clear majority: Ramesh Chennithala
Congress Maha Vikas Aghadi will form government with a clear majority: Ramesh Chennithala

मुंबई : भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महायुती पराभवाच्या भितीने मोठ्‌या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर करत असून भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार मध्ये मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पाच कोटी रुपये वाटल्याचे आरोप केले जात आहेत त्यामुळे तावडे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. 

या संदर्भात बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून मोठ्या प्रमाणात सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. आज वसई विरार येथे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस  विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. घटनास्थळी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळावरून १० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पण अद्याप तावडे यांना अटक केली नाही. प्रचार संपल्यानंतर नियमानुसार मतदारसंघाच्या बाहेरची व्यक्ती थांबू शकत नाही पण तावडे यांनी वसई विरारला जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आचारसंहिता भंग केल्याचे मान्य केले आहे. प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती व प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तावडे यांनी पाच कोटी रुपये वाटले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. फक्त वसई विरारच नाही तर राज्यभरात भाजपा आणि महायुतीकडून पैसे वाटून जनमत विकत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यभरात सुरु असलेल्या पैसे वाटपावर कारवाई करून पैसे वाटणा-यांना अटक करावी तरच निष्पक्ष निवडणुका पार पडतील असे चेन्नीथला म्हणाले.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here