Chhatrapati Shivaji Maharaj: उदयनराजेंकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा, म्हणाले..

bjp-udyanraje-bhosle-on-mahavikas-aghadi-morcha-governor-bhagat-singh-koshyari-chhatrapati-shivaji- maharaj-mumbai-news-update
bjp-udyanraje-bhosle-on-mahavikas-aghadi-morcha-governor-bhagat-singh-koshyari-chhatrapati-shivaji- maharaj-mumbai-news-update

नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं विधान तसंच सीमावादाचा मुद्दा आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. दरम्यान या मोर्चात सहभागी होण्याबद्दल भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udyanraje Bhosle)  यांनी भाष्य केलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत भाजपाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपाचे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील राज्यसभेचे खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात पत्र देण्यात आलं असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

 महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मोर्चा काढत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले “हा कोणत्याही आघाडीचा किंवा पक्षाचा प्रश्न नाही. याकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही. पण शिवप्रेमी नाराज आहेत हे नक्की आहे. जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष केलं तर फरक पडत नाही असं चित्र निर्माण होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे सतत घडत राहिलं तर चांगलं नाही”. राज्यपाल हे पद काही छोटं नाही. पण लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे असं उदयनराजेंनी सांगितलं.

 दरम्यान तुम्ही या आंदोलनात सहभागी होणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मी माझ्या परीने जे काही करायचं ते केलं आहे. त्यात कुठेही कमी पडलेलो नाही. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकालाच आस्था आहे. त्यामुळे ते आंदोलन करत असतील तर त्यात काही चुकीचं नाही. ते योग्यच करत आहेत. सर्वांनीच हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे असं मला वाटतं”.

उद्धव ठाकरे राज्यपालांच्या विधानावर राजकारण करुन भावना भडकवत आहेत का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “राजकारण होत आहे असं म्हणता येणार नाही. जे सत्तेत असतात तेच राज्यपालांची नेमणूक करतात. पण भाजपाने त्यांना असं बोला म्हणून सांगितलेलं नाही. त्या वक्तव्यासाठी पक्षाला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही. पण चूक झाली असेल तर कारवाई झाली पाहिजे”. राज्यापालांनी माफी न मागितल्याची खंत वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here