मुंबई : व्यवसाय, खेळ यांसह इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच आज माध्यम विश्वात तीव्र स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे बातम्या सनसनीखेज व भावनिक बनविण्याकडे कल वाढत आहे. वृत्तांकन करताना खरेपणा असावा, निर्भीडता असावी, राष्ट्रभाव असावा. परंतु खोडसाळपणा नसावा, असे सांगताना पत्रकारांनी मूल्याधिष्ठित पत्रकारिता करावी, तसेच शाश्वत जीवनमूल्ये जोपासावी, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांनी व्यक्त केले.
‘व्हॉइस ऑफ मिडिया’ (Voice of Media) या प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या देशव्यापी संघटनेच्या संकेतस्थळाचे उदघाटन तसेच पदाधिकार्यांचे पदग्रहण राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.७) राजभवन येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांनी संघटनेच्या सदस्यांना संविधानाच्या कक्षेत काम करण्याची तसेच पत्रकारितेची मूल्ये जपण्याची प्रतिज्ञा दिली.
कोश्यारी म्हणाले, पत्रकारिता करणे म्हणजे धारदार शस्त्रावर चालण्यासारखे कठीण काम आहे. आज डिजिटल माध्यमे व समाजमाध्यमे आल्यामुळे माध्यमांचा सदुपयोग तसेच दुरुपयोग देखील होताना दिसतो. माध्यम प्रतिनिधींनी राज्य घटनेच्या चौकटीत राहून काम करण्याची जी प्रतिज्ञा केली तशीच प्रतिज्ञा देशातील सर्व नागरिकांनी घेऊन त्यांनी देखील देशासाठी समर्पित भावनेने काम केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने म्हणाले, संस्थेची केवळ संख्यात्मक वाढ न करता संस्थेच्या माध्यमातून सक्षम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मल्टीमिडीयामध्ये काम करणारी पत्रकारांची चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न केला जाईल, कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला तसेच संस्थेच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीचे सदस्य, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
पत्रकारांच्या मागे मानसिक आधार उभं करण्याचं काम
‘व्हॉइस ऑफ मिडिया’ ही संघटना 21 राज्यात पसरली असून 18 हजार माध्यम प्रतिनिधी संस्थाना जोडले गेले आहेत. पत्रकारांच्या प्रश्नावर लढा देण्याबरोबरच समाजात सकारात्मकतेचे बीज पेरण्याचा काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. पत्रकारांच्या मागे मानसिक आधार उभं करण्याचं काम आम्ही यापुढील काळात करू. संदीप काळे, व्हाईस ऑफ मीडिया संस्थापक अध्यक्ष
एक नवी दृष्टी ठेवून संघटनेने काम करावे – पोपटराव पवार
सध्याच्या पत्रकारितेला सकारात्मकतेची किनार असणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी पत्रकारांनी एक नवी दृष्टी ठेवून काम करावे. व्हाईस ऑफ मीडिया ही एक नवा विचार घेऊन पुढे येत आहे. या संघटनेसाठी मी शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन पद्मश्री तथा हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने नरीमन पॉईट येथील कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळा आणि चिंतन बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबईचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, राज्याध्यक्ष राजा माने, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून, महिला प्रदेशाध्यक्ष शैलजा जोगल, राज्य उपाध्यक्ष अनिल मस्के, संघटक सुधीर चेके यांची उपस्थिती होती.
राज्य अध्यक्ष राजा माने म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नावर संघटनात्मक पातळीवर ठोस असे बदल झाले नाहीत. त्यामुळे एका चांगल्या पत्रकार संघटनेची पत्रकारांना गरज होती. ही पोकळी आता व्हाईस ऑफ मीडियाने भरून काढण्याचे काम चालू केले आहे, असे ते म्हणाले.
पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले, तुमची उपयोगिता हा सर्वात मोठा घटक माणसाच्या जिवनात असून आपण प्रत्येकाच्या कामी आले पाहीजे. ही संघटना गोरगरीब, दुर्बल, दुर्लक्षीत घटकांचा आवाज होईल, असा विश्वास व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.
संघटनेची पंचसुत्री
1 पत्रकारांसाठी घर.
2 पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण.
3 पत्रकारांच्या अपघात, भविष्य पुंजी बाबत तरतूद.
4 पत्रकाराने नवे तंत्रज्ञान शिकायचे.
5 पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन.