छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाला असून, ८ हजार ५५० पैकी ४ हजार २५१ गावांतील १६ लाख ८ हजार ३०१ हेक्टरवरील खरीप पिकांची माती झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) बुधवारी काय घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.
मराठवाड्यात जिरायतीच्या १५ लाख ९७ हजार ३६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शिवाय बागायतीचे ३ हजार ८६१ हेक्टर आणि फळपीकाचे ७ हजार ७१ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक १३७४ गावांना फटका नांदेड जिल्ह्यात बसला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी रात्री फडणवीस शहरात आले असता त्यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
विभागात अतिवृष्टी
सलग तिसऱ्या दिवशी मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १० मंडळात, जालना १५, नांदेड २, बीडमधील १४, अशा ४१ मंडळांत म्हणजेच ८२० गाांना पावसाचा तडाखा बसला. तीन
दिवसांत २१०० गावांत पाणीच पाणी झाले.
विभागात आजपर्यंत १०३ टक्के पाऊस झाला आहे. यात लातूर व परभणी वगळता सर्व जिल्ह्यांत १०० टक्क्यांच्या पुढे पाऊस गेला आहे. ६७२ मि.मी. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७०३ मि.मी. पाऊस झाला आहे.
२७० शेतकऱ्यांच्या पावसाळ्यात आत्महत्या
कर्जबाजारीपणा, नापिकी आणि मागील तीन महिन्यांत पावसाने मराठवाड्यात घातलेला थुमाकूळ, यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आठ महिन्यांत मराठवाड्यात तब्बल ७०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात जुन, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत २७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जानेवारी महिन्यात विभागात ८८, फेब्रुवारी महिन्यात ७५, मार्च महिन्यात ११०, एप्रिल ८८, मे महिन्यात ७८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. गतवर्षी ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन घोषणा करावी…
मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती 66 घेतलीव असेल. त्यानुसार त्यांनी १७ सप्टेंबर रोजी ओल्या दुष्काळाच्या अनुषंगाने विभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा निर्णय घ्यावा.
– संजय शिरसाट, पालकमंत्री
१६ लाख हेक्टरवरील पिकांत पाणी
जिरायत १५,९७,३६८ हेक्टर
बागायत ३ हजार ८६१ हेक्टर
फळपीक ७ हजार ७१ हेक्टर
एकूण १६ लाख ८३०० हेक्टर
किती गावांत झाले नुकसान?
जिल्हा गावे
छ. संभाजीनगर – ६१
जालना – १९९
परभणी – ३९१
हिंगोली – ८०५
नांदेड – १३७४
बीड – २६१
धाराशिव – ३७८
लातूर – ७८२
——————————–
एकूण – ४२५१



































































































































