… तर सरकारच्या खुर्चीखाली धमाका ; शिवसेनेचा सरकारला इशारा

shivsena-saamana-editorial-diwali-maharashtra-government-farmers-drought-news-update-today
shivsena-saamana-editorial-diwali-maharashtra-government-farmers-drought-news-update-today

मुंबई : सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय हा प्रश्न कायमच आहे. महागाई बेरोजगारी आर्थिक मंदीचे सावट बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे अशी टीका शिवसेनेने (ShivSena) ‘सामना’ संपादकीयमधून (Saamana Editorial) केली आहे.

काय म्हटलं संपादकीयमध्ये ?

“कितीही संकटे येवोत, जीवन-मरणाचे प्रश्न उभे राहोत, पण मुळातच उत्सवप्रिय असलेला आपला समाज सणवार आले की, या अडीअडचणी व संकटांना तात्पुरते का होईना, बाजूला ठेवून सणाच्या आनंदात मोठय़ा उत्साहाने सहभागी होतो. यंदाचा दिवाळीचा सणही सालाबादप्रमाणे हर्षोल्हासात साजरा होत असला तरी या आनंदोत्सवालाही चिंतेची आणि काळजीची एक किनार आहेच. राज्यातील महानगरे व मोठय़ा शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“पगाराची निश्चित रक्कम मिळणारा चाकरमानी वर्ग, सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीला असणाऱया मंडळींना दिवाळीनिमित्ताने मिळणारा बोनस आणि निश्चित उत्पन्नामुळे कर्ज देण्यास तत्पर असलेल्या बँका यामुळे दिवाळीच्या काळात सर्वत्र खरेदीचा माहौल दिसत असला तरी पगार, बोनस मिळत नसलेल्या गरीब शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱया मंडळींच्या नशिबी मात्र खरेदीची ही चंगळ नसते. त्यातूनही असेल तेवढय़ा उत्पन्नातून चार पैसे वाचवून मुलाबाळांसाठी फटाक्यांची खरेदी, थोडेफार गोडधोड करून दिवाळीचे स्वागत करण्याचा प्रयत्न जो तो करीत असतो. याचा अर्थ लोकांना दैनंदिन जीवनात जे प्रश्न भेडसावताहेत, त्यांचा जनतेला विसर पडला या भ्रमात सरकारने राहू नये,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

या फटाक्यांची वात जेव्हा…

“केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“रोजची आव्हाने व सततच्या धबडग्यातून मनाला उभारी देणारा दिवाळीचा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, दिवाळीचा हा सण दणक्यात साजरा होत असतानाच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे, त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले.

राज्यातील बळीराजा आज अंधारात

ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे. सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? हा प्रश्न कायमच आहे. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदीचे सावट, बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे.

ओला दुष्काळ जाहीर करून आणि हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशकिरणांची थोडीशी तरी तिरीप टाकायलाच हवी. अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here