मुंबई: एकनाथ शिंदे गटातील नेते कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने अब्दुल सत्तार यांच्या मुंबई,औरंगाबादेती घरावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. यात त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.
हेही वाचा: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral
औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं होते.
राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तारांचा औरंगाबादेतील बंगला फोडला. यावेळी सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता परंतु कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. सत्तारांचा राजीनामा घेतला नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष शेख कय्यूम,शहराध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन,महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल, माजी नगरसेविका अंकिता विधाते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सत्तारांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. सत्तारांना फिरू देणार नाही असा यावेळी इशारा दिला.