छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल (Mehraj Patel) यांनी् पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मेहराज पटेल यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chaknkar), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.सतिष चव्हाण, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला.
शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला गेल्या काही दिवसांपासून मरगळ आली. पक्षाचे शहर अध्यक्ष ख्वॉजा शरफोद्दीन यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळत नव्हती. महिलांना विश्वासात घेतले जात नव्हते. कार्यक्रमाचा निरोप मिळत नव्हता. पांडुरंग तांगडे पाटील हे सुध्दा लक्ष देत नव्हते. ख्वॉजा शरफोद्दीन यांच्या विरोधात तक्रारी वाढल्या होत्या तरी सुध्दा त्याची कुणीही साधी दखल घेतली नाही. त्यामुळे पक्षातील महिला नाराज झाल्या होत्या. अखेर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा मेहराज पटेल यांनी या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी खिंडार शहर जिल्ह्यात पडणार आहे. अशीही माहिती समोर येत आहे.
विकास कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
मी गेल्या पंधरा वर्षापासून शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास करून पक्षात काम करत होते. मात्र, काही दिवसांपासून पक्षामध्ये आम्हाला सन्मान पूर्वक वागणूक मिळत नव्हती. जनतेची कामे करण्यासाठी वरिष्ठांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. आम्ही पक्षात पदावर राहून जनतेला तसेच सहका-यांना न्याय देऊ शकत नव्हते, त्यामुळे मी पक्ष बदल्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष सतीष चव्हाण, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.
-मेहराज पटेल, नेत्या. राष्ट्रवादी काँग्रेस.
























































































































































































