‘’राज्यपालांचे ‘आ बैल मुझे मार’ सारखे वर्तन, इथे बैल नसून ‘वाघ’आहे’’; शिवसेनेचा टोला

Governor Bhagat Singh Koshyari left for Uttarakhand by private plane
Governor Bhagat Singh Koshyari left for Uttarakhand by private plane

मुंबई l मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून ‘राजकीय’ भाषेत पत्र लिहिणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपावर शिवसेनेनं पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ‘राज्यपालांनी या प्रकरणात आ बैल मुझे मार असेच वर्तन केले. पण इथे बैल नसून ‘वाघ’ आहे हे ते विसरले? या सर्व ‘धुलाई’ प्रकरणात भाजपचेही वस्त्रहरण झाले. असा सणसणीत टोला शिवसेनेनं हाणला आहे. (Shiv Sena  Bhagat- Singh Koshyari)

राज्यपालांचा वापर करून महाराष्ट्र सरकारवर हल्ले करणे त्यांना महागात पडले. या प्रकरणात भाजप व त्यांनी नेमलेले राज्यपाल इतके उघडे पडले आहेत की श्रीकृष्णाने वस्त्रे पुरविली तरी त्यांची अब्रू वाचणार नाही,’ अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे.

भाजपला प्रार्थना स्थळे उघडायचीच असतील तर त्यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटायला हवे व त्याबाबत संपूर्ण देशासाठीच एक राष्ट्रीय धोरण ठरवायला हवे. तेच योग्य ठरेल. मंदिरे किंवा इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे का उघडत नाहीत? तुम्ही हिंदुत्वाचा त्याग केला आहे काय? असे प्रश्न विचारणारे पत्र राष्ट्रपती कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवल्याचे दिसत नाही,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा lCongress l काँग्रेसची आज भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभा!

‘राज्यपाल कोश्यारी हे सध्या गोव्याचेही राज्यपाल आहेत. तिथंही मंगेशी, महालक्ष्मी, महालसा अशी सर्व देवस्थाने कुलूपबंदच आहेत. काही छोटी मंदिरे उघडायला तेथे परवानगी देण्यात आली असली तरी मंगेशी, महालसा, महालक्ष्मी, श्री कामाक्षी संस्थान ही मोठी देवस्थाने बंदच आहेत.

कामाक्षी देवस्थानचा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. राज्यपालांची नियत साफ असती तर त्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी पत्र लिहून चिंता व्यक्त केली असती,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘भाजपचे लोक राजभवनात जातात व राज्यपालांना भरीस पाडतात. राज्यपाल पदाप्रमाणेच मुख्यमंत्री पदाचीही एक प्रतिष्ठा आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ही प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी राज्यपालांवर जास्त आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरू आहे. ही प्रतिष्ठा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे राज्यपालांना माघारी बोलवतील,’ अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.