मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या ६५ पानी अहवालात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांसाठी हा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो
त्यानंतर आता सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाची अस्वस्थता अजून वाढणार असल्याचे म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. “सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो!,” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सत्तेसाठी असत्याचा कितीही गोंगाट केला तरी सत्य हे कधीच झाकलं जात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!
यातून सत्तेसाठी हपापलेल्या भाजपची अस्वस्थता अजून वाढणार असल्याने त्यांना मनःशांती लाभो आणि खोटारडेपणा करुन राज्याला बदनाम आणि अशांत न करण्याची सद्बुद्धी मिळो, अशी मी प्रार्थना करतो! https://t.co/04BcMbneWP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2021
रोहित पवार यांनी या ट्विटसोबत आधीचे आणखी एक ट्विट पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राजीनामा दिला होता याचा उल्लेख केला आहे.
पाच वेळा बजावले समन्स
अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ समन्स बजावले आहेत. त्यात पहिले समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगितले होते. दुसरे समन्स २६ जून रोजी देऊन ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं. तिसरे समन्स बजावल्यानंतर ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर चौथे समन्स ३० जुलै रोजी बजावण्यात आल्यानंतर अनिल देशमुख यांना २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी हे पाचवे समन्स बजावत ईडीने १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. मात्र यावेळीही अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत.
Anil Deshmukh l 100 कोटी वसूली प्रकरणात अनिल देशमुखांना CBI कडून क्लीनचिट?
आत्तापर्यंत ईडीची छापेमारी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
सत्तेच्या हव्यासापोटी आंधळ्या भाजपाकडून पुन्हा मंदिराचे राजकारण !; सचिन सावंतांचा हल्लाबोल

























































































































































