Covid Third Wave l २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट; या देशांची वाढली चिंता!

जागतिक रुग्णसंख्येने ओलांडला १३ कोटी ३० लाखांचा टप्पा, २८ लाख ८६ हजार मृत्यू

covid-19-global-caseload-now-over-13-crore-covid-third-wave-news-updates
covid-19-global-caseload-now-over-13-crore-covid-third-wave-news-updates

नवी दिल्ली l कोरोनाचा कहर जगात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. एका दिवसात भारतामध्ये सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे भारतामध्ये कोरोना रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे जगभरातील २२ देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. यामध्ये ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. covid-19-global-caseload-now-over-13-crore-covid-third-wave-news-updates

आयएएनएसच्या वृत्तानुसार जगभरामध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झालाय. तर १० कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केलीय. जगभरामध्ये दोन कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरु असणाऱ्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना कोरोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणं दिसून येत आहेत तर ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागलाय. जगभरामध्ये कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली आहे. या दुसऱ्या लाटेमध्येच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीय आणि सर्वाधिक मृत्यू सुद्धा याच कालावधीमध्ये झालेत.

२१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र सातत्याने करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. या कालावधीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी सध्या दिवसाला पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.

 अमेरिकेत एका दिवसात तीन लाख ८० हजार रुग्ण

अमेरिकेतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असं दिसून येतं की पहिल्या लाटेमध्ये येथे ८० हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळून येत होते. दुसऱ्या लाटेमध्ये या संख्येत एक हजार पटींनी वाढ झाल्याचं दिसून आलं.

दुसऱ्या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल तीन लाख ८० हजार रुग्णही आढळून आलेत. याचप्रमाणे ब्राझीलमध्ये पहिल्या लाटेत दिवसाला ७० हजार करोना रुग्ण आढळून यायचे ती संख्या ९७ हजारांहून अधिक झाल्याचे दुसऱ्या लाटेत पहायला मिळालं. आता येथे करोनाची तिसरी लाट आली आहे.

जपानमध्ये चौथ्या लाटेची भीती

जपानमध्ये १०७ दिवसांनंतर ऑलम्पिक सुरु होणार आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी जपानमध्ये अडीच हजार नवे रुग्ण आढळून आल्याने देशात चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

जपानचे आरोग्य मंत्री नोरीहिसा तामुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश व्हेरिएंटमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. जपानमध्ये सोमवारी दोन हजार ४५८ नवे रुग्ण आढळून आले तर १० जणांचा मृत्यू झाला. शनिवारी नव्याने संसर्ग झालेल्यांचा आकडा दोन हजार ७०२ इतका होता. शनिवारी आठ जणांचा मृत्यू झाला होता.

युरोपमध्ये ११ लाख मृत्यू

युरोपमधील ५१ देशांमध्ये आतापर्यंत ११ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसहीत पाच युरोपीयन देशांमध्ये एकूण करोना मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद झालीय.

हेही वाचा: Coronavirus update l भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये नो एंट्री

तर अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या पाच लाख ५५ हजार इतकी आहे. कोणत्याही देशात करोनामुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. मागील तीन आठवड्यांमध्ये अमेरिकेतील मृत्यूंचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

 ३७ कोटी लोकांना कोरोनाची लस

अवर वर्ल्ड इन डेटाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार रविवारपर्यंत किमान ३७ कोटी ३० लाख जणांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय. जागतिक आरोग्य संघटनेने जगातील गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी मोठ्या देशांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here