AIMIM l एआयएमआयएममध्ये अध्यक्षपदासाठी चार माजी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच!

शहराध्यक्षाची निवड कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष  

MIM to contest full Lok Sabha seats; mp asaduddin owaisi announced in Aurangabad
MIM to contest full Lok Sabha seats; mp asaduddin owaisi announced in Aurangabad

औरंगाबाद l ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) मध्ये औरंगाबाद शहराध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तत्कालीन शहराध्यक्ष शारेख नक्शबंदी यांच्या उचलबांगडीनंतर चार माजी नगरसेवक तसेच दोन पदाधिका-यांमध्ये स्पर्धेत असल्यामुळे शहराध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएमला शहराध्यक्ष नाही. दुसरीकडे राज्यात मध्यावधी निवडणुका होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एआयएमआयएम या पक्षाची शहरात चांगली ताकद असताना तसेच खासदार असताना ते शहराध्यक्ष,जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करण्यासाठी एवढा विलंब का करत आहेत असा प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांना पडला आहे.

एआयएमआयएमच्या शहराध्यक्षपदासाठी माजी गटनेते नासेर सिद्दीकी, माजी नगरसेवक जमीर कादरी, माजी नगरसेविकेचे पती आरीफ हूसेनी, अय्युब जहाँगिरदार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एमआयएमच्या शहर व जिल्हाध्यक्षांची 13 जून रोजी उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर एआयएमआयएममध्ये शहराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

तत्कालीन शहराध्यक्ष शारेख नक्शबंदी गेल्या दीड वर्षांपासून शहराध्यक्षपदाची धूरा सांभाळत होते. परंतु त्यांना पक्षवाढीसाठी खूप काही काम करता आले नाही. खासदारांचा हस्तक्षेप असल्यामुळे त्यांना निर्णय घेताना त्रास होत होता. अशीही चर्चा एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. तर शारेख नक्शबंदी यांना संघटन वाढीसाठी काहीच केले नाही अशीही कुजबूज पक्षामध्ये कार्यकर्ते करत आहेत.

ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर शारेख नक्शबंदींची उचलबांगडी करण्यात आली. आता त्यांच्या जागेवर चार माजी नगरसेवक इच्छूक आहेत. नासेर सिद्दीकी हे सामाजिक कार्यातून एआयएमआयएममध्ये दाखल झाले होते. त्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी मनपामध्ये गटनेतेपद भूषविले आहेत.

नासेर सिद्दीकी हे आक्रमक तसेच अभ्यासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. त्यांनी 2019 मध्ये मध्य मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये शिवसेना उमेदवाराला जोरदार फाईट दिली होती. मात्र वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एआयएमआयएम या तिन्ही पक्षांमध्ये मतविभाजन झाल्यामुळे त्यांना हार पत्कारावी लागली होती.

तर जमीर कादरी हे पत्रकारीतेतून राजकारणात गेले होते. पहिल्याच निवडणुकीत नगरसेवक झाले होते. त्यांचे वॉर्डात चांगले काम आहे. तर आरेफ हूसेनी हे सुध्दा सामाजिक कार्यातून राजकारणात उतरले. त्यांच्या पत्नी ह्या नगरसेविका होत्या. ते सुध्दा उच्चशिक्षित असून अभ्यासू नेते आहेत. तर अय्युब जहागिरदार यांनी समाजवादी, काँग्रेसमध्ये खूप वर्ष काम केले. त्यानंतर एआयएमआयएम मध्ये प्रवेश केला व नगरसेवक झाले होते. यांच्यासह दोन पदाधिकारीसुध्दा शहराध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. खासदार इम्तियाज जलील हे महाराष्ट्राचे एआयएमआयएम प्रदेशाध्यक्ष असून ते कुणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

इम्तियाज जलिलांकडे इच्छूकांचे लक्ष

खासदार इम्तियाज जलील हे एआयएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. ते ज्या कार्यकर्त्याला शहराध्यक्षपद देतील ते अंतिम राहणार आहे. परंतु ते शहर व जिल्हाध्यक्षांची कधी नियुक्ती करणार, कोणता चेहरा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here