राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या भाजपाच्या पत्रासंदर्भात अजित पवार संतापले

government-in-majority-has-right-to-take-decisions-deputy-cm-ajit-pwar-when-ask-about-letter-sent-by-bjp-on-pretext-of-eknath-shinde-news-update-today
government-in-majority-has-right-to-take-decisions-deputy-cm-ajit-pwar-when-ask-about-letter-sent-by-bjp-on-pretext-of-eknath-shinde-news-update-today

मुंबई: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकावल्याने अस्थिर झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जारी करण्यात येणाऱ्या शासन आदेशांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपाने केली आहे. मात्र भाजपाने यासंदर्भात राज्यपालांना पत्रा पाठवून विनंती केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit pawar) यांनी कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. राज्यामध्ये बहुमताचं सरकार असून सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं अजित पवारांनी भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना म्हटलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाने पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे शिंदे बंडप्रकरणात उडी घेत राज्यपालांना महाविकास आघाडीच्या शासन आदेशांच्या धडाक्याविरोधात पत्र पाठवलं.

आमदार प्रवीण दरेकरांचे पत्र

भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पक्षाच्यावतीने हे पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये भाजपाने महाविकास आघाडी सरकार राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्याने घाईघाईत शासन आदेश जारी करत असून यासंदर्भात संशय घेण्यास वाव असल्याचं म्हटलंय. ज्या वेगाने शासन आदेश जारी केले जात आहेत ते पाहता यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं अशी मागणी भाजपाने केलीय.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

सध्याची राज्यातील स्थिती पाहता हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यपालांकडे भाजपाने केली आहे. अस्थिर स्थिती पाहून महाविकास आघाडी सरकार अंदाधुंद निर्णय घेत आहे असा आरोप भाजपाने राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रामधून केलाय. घाईघाईनं शासन आदेश जारी होत आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असं दरेकर यांनी पक्षाची बाजू मांडताना म्हटलंय.

राज्यातील राजकीय स्थिती तीन दिवसांमध्ये अत्यंत अस्थिरतेची झाली आहे. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने १६० हून अधिक शासन आदेश काढलेले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली काढलेले जीआर संशय वाढवणार आहेत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

याच मुद्द्यावरुन अजित पवारांना मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यासंदर्भातील सल्लामसलत करण्यासाठी शरद पवारांसोबत यशंवतराव चव्हाण सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळेस अजित पवारांना भाजपाने राज्यपालांना महाविकास आघाडीच्या जीआर धडक्याविरोधात पत्र पाठवल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “आज सरकार बहुमतात आहे. लोकशाहीनुसार सरकारला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्याकडे बहुमत आहे तर तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहेच. ज्या विभागाची कामं आहेत त्या विभागाच्या मंत्र्यांना अधिकार आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

अन् अजित पवारांनी मंत्र्यांची यादीच ऐकवली

याच मुद्द्यावर महिला पत्रकाराने, “एवढे सारे मंत्री बाहेर असताना जीआर कसे पास होत आहेत?,” असा प्रश्न विचाला. हा प्रश्न ऐकून अजित पवारांनी प्रश्न विचारणाऱ्या महिलेला मंत्र्यांची यादीच ऐकवली. “कोण एवढे मंत्री बाहेर आहेत? अजित पवार इथे आहे.

उद्धव ठाकरे इथे आहेत. वळसे-पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण सगळेच तर इथे आहेत,” अशी यादीच अजित पवारांनी ऐकवत प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत जीआरसंदर्भातील निर्णय झाल्याचं जराश्या संतापलेल्या स्वरामध्येच सूचित केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here