काँग्रेसने चेहरा बदलला, मतांसाठी ‘मन’ परिवर्तन कसे कराल?

मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या नवनिर्वाचीत अध्यक्षांची लागणार कसोटी

Congress has changed its face, how to change the 'mind' for votes?
Congress has changed its face, how to change the 'mind' for votes?

औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव तत्कालीन उध्दव ठाकरे सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्यासह शेकडो पदाधिका-यांनी नामांतराचा निषेध म्हणून राजीनामे दिले होते. २४ दिवसानंतर काँग्रेसने शेख युसुफ यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. काँग्रेसने चेहरा बदलला परंतु मतांसाठी मुस्लीम समाजाचे ‘मन’ कसे परिवर्तन करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महापालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काँग्रेसचा व्होट बँक समजला जाणारा मुस्लीम मतदार महाविकास आघाडीच्या नामांतर निर्णयावरुन प्रचंड नाराज आहे. तर दुसरीकडे एमआयएम पक्षाकडे खासदार आहेत. एमआयएमची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचे २६ नगरसेवक निवडूण आले होते. एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून मुस्लीम चेह-याला संधी देण्यात आली परंतु नामांतरच्या प्रश्नावरुन मतदारांना काय उत्तर देणार हा खरा प्रश्न आहे. मुस्लीम मतदार विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भरभरून मतदान करतात. नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचा मुस्लीम मतदार हा काँग्रेसपासून दूर जाणार, अशी माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविली होती. परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे एकूण चित्र आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला दुटप्पीपणा भोवणार…

काँग्रेस,राष्ट्रवादीचे नेते नामांतराचा विषय आमच्या अजेंड्यात नव्हता असे सांगत होते. परंतु नामांतरचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतरही त्यांचा निषेध केला नाही. फक्त समान विकास कार्यक्रमात नामांतराचा विषय नव्हता असे सांगून वेळ मारून नेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदार त्यांना निवडणुकीत त्यांचा हिसका दाखवतील असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

जाता जाता निर्णय बदलला…

‘आधी सुख समृध्दी नंतर संभाजीनगर’ असे मत उध्दव ठाकरें यांनी ९ जून रोजी शहरात जाहीर सभेत मांडले होते. औरंगाबादचे नाव आताही मी संभाजीनगर करुन टाकू शकतो. परंतु संभाजी महाराजांच्या नावाला साजेसं, असं शहर बनलं पाहिजे. मात्र २९ जून रोजी त्यांनी नामांतरावर शिक्कामोर्तब केले होते.

आम्ही मतदारांची समजूत काढू…

नामांतराचा विषय हा काँग्रेसच्या समान विकास कार्यक्रमात नव्हता. आम्ही नामांतराचे समर्थन करत नाही. तत्कालीन मुख्मंत्री उध्दव ठाकरेंनी जो निर्णय घेतला होता तो अचानकपणे विषय आला. आमच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही लोकांपुढे आमची भूमिका मांडू.

शेख युसुफ लिडर, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी

सुरक्षित विकसित औरंगाबादसाठी लढा…

नामांतराचा निषेध म्हणून मी राजीनामा दिला. धर्मनिरपेक्ष गांधीवादी विचारसरणीसाठी तसेच औरंगाबाद व देशाच्या विकासासाठी माझा लढा सुरु राहिल. मला पाच वर्ष अध्यक्ष म्हणून काम करता आले असते, परंतु मी विचारांशी कधीही तडजोड करु शकत नाही. सफर लंबा हो ये जरुरी नही, सफर यादगार होना चाहिए.

हिशाम उस्मानी, माजी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here