काँग्रेसचा मंगळवारी २६ जुलै रोजी राज्यभर शांततापूर्ण ‘सत्याग्रह’

सोनिया गांधींना चौकशीच्या नावाखाली हुकूमशाही मोदी सरकारकडून नाहक त्रास, नाना पटोलेंचा आरोप

Congress on Tuesday, July 26, will hold a peaceful 'Satyagraha' across the state including Mumbai
Congress on Tuesday, July 26, will hold a peaceful 'Satyagraha' across the state including Mumbai

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार २६ जुलै रोजी पुन्हा एकदा शांततापूर्ण सत्याग्रह करून या कारवाईचा विरोध करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. 

यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरोधात मंगळवार २६ जुलै २०२२ रोजी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर सकाळी १०.०० वाजता सत्याग्रह केला जाणार असून जोपर्यंत सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयातुन मुक्त केले जात नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरुच राहणार आहे.

२१ तारखेला सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते आता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. खा. राहुल गांधी यांचीही पाच दिवस दररोज १०-१० तास ईडीने चौकशी केली. या चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही व होणार नाही. ईडीचे अधिकारी केंद्रातील त्यांच्या ‘बॉस’च्या इशाऱ्यावर नाचत आहेत. चौकशीच्या नावाखाली विरोधकांना त्रास देण्याचे भाजपाचे राजकारण फारकाळ टिकणार नाही.

काँग्रेस पक्षाने सुडाचे राजकारण कधीच केले नाही पण केंद्रात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देत आहे. काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही दडपशाहीला घाबरत नाही. काँग्रेस पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. हुकुमशाही सरकारला जनताच त्यांची जागा दाखवेल असेही पटोले म्हणाले.

या शांततापूर्ण सत्याग्रहामध्ये काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. तर राज्यभर जिल्हा मुख्यालयी जिल्हा काँग्रेसचे नेते पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदारांसह सर्व विभाग, सेल, आघाडी यांचे पदाधिकारीही सत्याग्रहात सहभाही होऊन केंद्र सरकारच्या अत्याचाराचा निषेध करतील असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here