छत्रपती संभाजीनगरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरूच राहील

मुख्यमंत्री फडणवीस : भूसंपादनासाठी निधी कमी पडला तर शासन देईल

Road widening campaign will continue in Chhatrapati Sambhajinagar
Road widening campaign will continue in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम कौतुकास्पद आहे. भविष्यात शहरात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. अनाधिकृत बांधकामे काढल्यानंतर रस्ता तयार करण्यासाठी आणि भूसंपादनासाठी निधीची गरज भासल्यास शासन मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शनिवारी (दि.२३) दिली. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर हे देशाचे मॅन्युफॅक्चरिंग आणि ई-व्हीचे हब होत आहे. स्मार्ट सिटी आणि डीएमआयसीमुळे शहराला अनेक मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम असणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते मोकळे आणि रुंद होणे ही गरज आहे. मनपा, पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन ही मोहीम सुरू केली आहे. अनधिकृत अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते तयार करणे आणि ज्यांची जागा या मोहिमेत जाते त्यांना मोबदला देणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. रस्ता तयार करण्यासाठी आणि भूसंपादनासाठी निधी कमी पडला, तर शासन त्यासाठी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पाडापाडीला वेग येण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांत मनपाची रस्ता रुंदीकरणाची मोहीम मंदावली होती. शिवाय गणेशोत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्त उपलब्ध होईल का, याबाबत शंका निर्माण झाली होती. त्यामुळे मोहीम थांबण्याची चर्चा होती. मात्र शुक्रवारी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी हर्सूल परिसराची पाहणी करून गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण होईल असे सांगितले. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीदेखील या मोहिमेला पाठिंबा दिल्याने पुन्हा एकदा मोहीम वेग घेईल, अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here