राहुल गांधींनी भर बर्फवृष्टीत सांगितला डोळ्यात पाणी आणणारा इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग

when-former-pm-indira-gandhi-shot-dead-that-time-i-am-in-school-congress-leader-mp-rahul-gandhi-tells-story-news-update
when-former-pm-indira-gandhi-shot-dead-that-time-i-am-in-school-congress-leader-mp-rahul-gandhi-tells-story-news-update

श्रीनगर : काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. आज सकाळपासूनच काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु असून बर्फवृष्टीतच काँग्रेसची समारोप सभा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगितला. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा असून प्रेम, बंधुभाव वाढावा यासाठी भारत जोडो यात्रेने प्रयत्न केले असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी काश्मिरच्या लोकांच्या भावनेला हात घालत आपली आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर आपल्या मनावर काय परिणाम झाला, याची थोडक्यात माहिती दिली. आज ज्यांच्या घरातले सैनिक शहीद होतात, काश्मिरमधील लोक जेव्हा स्वतःच्या घरातले जवळचे लोक गमावतात, तेव्हा त्यांची मनस्थिती काय होत असेल? हे मी आणि माझी बहीण चांगल्यारितीने समजू शकतो, कारण आम्ही दोघे त्या परिस्थितीतून गेलो असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

दादी को गोली मार दी…

“मी १४ वर्षांचा होतो. शाळेत असताना मला एक शिक्षक बोलवायला आले. त्यांनी सांगितले की मला मुख्याध्यपकांनी बोलावलं आहे. मला वाटलं मुख्याध्यापकांनी बोलावलं म्हणजे माझी काहीतरी तक्रार झाली असेल. कारण मी शाळेत असताना खूप मस्तीखोर होतो. पण त्या शिक्षकाच्या देहबोलीवरुन मला काहीतरी विचित्र झाल्याचा भास झाला. मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेल्यावर ते म्हणाले, “राहुल तुझ्या घरून फोन आला आहे.” तेव्हा देखील मला जाणवलं की काहीतरी वेगळं घडलेलं आहे. मी फोन कानाला लावला. पलीकडून आई बोलत होती. तिच्यासोबत आमच्या घरात काम करणारी एक महिला देखील उभी होती. तिचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता. ती ओरडत होती, “दादी को गोली मार दी, दादी को गोली मार दी…”, हा प्रसंग सांगत असताना राहुल गांधी खूपच भावूक झाल्याचे दिसले.

पंतप्रधान मोदी, अमित शाह, अजित डोभाल यांना हे समजणार नाही

“हे जे मी सांगतोय, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह, अजित डोभाल यांना समजणार नाही. पण ही गोष्ट काश्मिरच्या लोकांना समजेल. सीआरपीएफ, आर्मीच्या लोकांनाही ही गोष्ट समजेल. यानंतर राहुल गांधी म्हणाले की, शाळेतून मी घरी गेलो. जिथे इंदिरा गांधी यांना गोळ्या लागल्या ती जागा पाहिली. तिथे रक्त सांडले होते. त्यानंतर पप्पा (राजीव गांधी) आले, आई आली. आईला बोलायलाही येत नव्हतं.”, हे सांगत असताना भर बर्फवृष्टीत राहुल गांधी स्तब्ध झाले आणि त्यांना काही मिनिटं बोलायचेच सुचले नाही.

राजीव गांधी हत्या झाल्यानंतर मला फोन आला

आपल्या देशातील सैन्याच्या पालकांना अनेकदा एक फोन येतो. हजारो काश्मिरी लोकांना एक फोन आला असेल. तसाच एक फोन मला आला. माझ्या वडीलांच्या एका मित्राने मला फोन केला. ते म्हणाले, राहुल एक वाईट बातमी आहे. पप्पाचे निधन झाले. मी म्हणालो, मला कळलं. धन्यवाद. मला या प्रसंगातून हेच सांगायचे आहे की, आरएसएस, मोदीजी, डोभाल हे हिंसा घडविणारे लोक या दुःखाला समजू शकत नाहीत. मी या दुःखाला समजू शकतो. पुलवामाच्या सैनिकांच्या मुलांच्या मनात काय घालमेल झाली असेल ती समजू शकतो. काश्मिरच्या लोक जेव्हा स्वतःचे नातेवाईक गमावतात, तेव्हा त्यांचे दुःख मी आणि माझी बहीण समजू शकते.

हे फोन येणं मला बंद करायचंय

हे जो फोन येतात आणि आपला जवळचा व्यक्ती गेल्याचे सांगतात. ते बिलकुल बंद व्हावेत. असे माझे लक्ष्य आहे. तेच भारत जोडो यात्रेचं उद्दिष्ट आहे. भाजप-आरएसएसचे लोक मला शिव्या घालतात. मी त्यांना धन्यवाद देतो. द्वेषाच्या बाजारात मी प्रेमाचे दुकान उघडण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला असल्याचे सांगून राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here