महाराष्ट्रात ई-पासमुक्तीची आज घोषणा

मंगळवारपासूनच ही सक्ती रद्द होण्याची शक्यता

E-pass exemption announced in Maharashtra today
E-pass exemption announced in Maharashtra today

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी ई-पासचे बंधन लावण्यात आले होते. खासगी वाहनांवरील ई-पासचे बंधन हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  याबाबतची अधिसूचना आज, सोमवारी जाहीर केली जाणार असून मंगळवारपासूनच ही सक्ती रद्द होण्याची शक्यता आहे.

राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला होता. परंतु खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत ई-पास सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारने अनलॉक 4.0 चौथ्या टप्प्याची नियमावली जाहीर करताना मेट्रो सेवा, सार्वजनिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्था यांना अंशत: परवानगी दिली आहे. तसेच राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यात कोणत्या सवलती देता येतील याचा आढावा घेण्यात आला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजयकु मार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित  होते.

राज्यातील करोनाच्या परिस्थितीत ई-पासचे बंधन दूर केल्यास गर्दी वाढेल की कसे याबाबत चर्चा झाली. एसटी प्रवासाला ई-पासचे बंधन नसल्याने आता आंतरजिल्हा प्रवास सुरू झालेलाच असल्याने खासगी प्रवासासाठीही ई-पास रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

ई-पास रद्द होणार असल्यामुळे सर्वसामान्यांना राज्यांतर्गत प्रवासाचे स्वातंत्र्य मिळणार असून त्यायोगे जनजीवन आणि अर्थचक्र  सुरळीत होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवापूर्वी एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू करताना एसटी प्रवासासाठीचे ई-पासचे बंधन दूर केले होते. मात्र, खासगी वाहनांसाठी ते निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. याबद्दल प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here