MNS : मनसेचा सविनय कायदेभंग, रेल्वे पोलिसांना गुंगारा देऊन संदीप देशपांडेंचा रेल्वे प्रवास

MNS -Mumbai -Local -Protest -sandeep deshpande -travel from train-today
MNS -Mumbai -Local -Protest -sandeep deshpande -travel from train-today

मुंबई : सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सुरु करा या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला आहे. ठाणे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. (MNS Mumbai Local Protest sandeep deshpande travel from train)

रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी आज सोमवारी लोकल ट्रेनने प्रवास केला. त्यांच्यासह संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनी रेल्वे प्रवास केला. तर ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो सरकारचा समज झाला असावा

“सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांना ड्यूटीसाठी सहा सहा तास बसने प्रवास करावा लागत आहे. आम्ही शासनाकडे रेल्वे सुरु करा अशी मागणी केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत,” अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली.

मनसे नेते अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

ठाणे रेल्वेस्थानकावर मनसे नेते अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना रेल्वे प्रवास करु द्यावा, अशी तीन वेळा विनंती हात जोडून केली. “मला पाच मिनिटं द्या, मी रेल्वेतून प्रवास करतो. त्यानंतर माझ्यावर जो गुन्हा दाखल करायचा तो करा,” अशी विनंती अविनाश जाधव पोलिसांना केली.मात्र पोलिसांकडून त्यांना परवानगी मिळाली नाही. ठाणे रेल्वेस्थानकावर कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.

वेळ लागेल पण प्रवास होणार…मी रेल्वेतून प्रवास करणार,”

“वेळ लागेल पण प्रवास होणार…मी रेल्वेतून प्रवास करणार,” असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. जर परवानगी दिली नाही, तर गनिमी काव्याने आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला आहे. या सर्व प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह 6 जणांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.

आंदोलनापूर्वी मनसैनिकांना पोलिसांच्या नोटीस

मनसेच्या सविनय आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या. तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे. सर्व सामान्य लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आज होणाऱ्या आंदोलनाआधी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here