आमच्या मायबहिणींच्या रोजच्या स्वयंपाकात नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओल्या नारळाचे खोबरे किंवा गोटा खोबऱ्याचे सुके खोबरे प्रत्येकाच्या घरात हमखास कामाला स्वयंपाकघरात सापडतात. परंतु खोब-याचे इतरही फायदे काय आहेत ते जाणून घेऊ या.
पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते.
ओला नारळ, सुखे खोबरे, नारळपाणी, नारळाचे दूध, नारळाचे तेल आणि तूप उपयुक्त आहे. एवढेच नव्हे तर नारळाची शेंडी आणि करवंटीसुद्धा उपयोगी आहे.
अंगाची आग होणे, विष्ठा किंवा थुंकीतून रक्त पडत असेल तर ओले खोबरे, काळा मनुका किंवा खडीसाखरेसोबत चघळून खावे.
गळय़ात खवखवून खोकला येत असेल किंवा तहानेने घशाला शोष पडत असेल तर ओला नारळ चावून खावा.
खोबरे हे बलवर्धन आहे. अशक्त माणसांनी खडीसाखरेसोबत खावे. औषधी उपयोग करताना काळय़ा मनुकांबरोबर खावे. पुरुषांमधील वंध्यत्वात शुक्राणूवृद्धीसाठी हा प्रयोग अवश्य करून पाहावा.
घरगुती नारिकेल तेल कॉडलिव्हर ऑइलपेक्षा खूप चांगले काम देते. त्यासाठी क्षयी व्यक्तींनी ओले खोबरे खावे आणि ताजे तेलही प्यावे.
माड किंवा नारळाचे सर्वच भाग उपयोगी पडतात. पूर्वी अनेक गावांमध्ये नारळाच्या झाडाच्या झावळय़ा घरांचे छप्पर शाकारण्यासाठी वापरल्या जात असत.
महिलांनी गरोदरपणी नियमित ओल्या नारळाचे खोबरे खाल्ल्यास जन्माला येणारे बाळ गोरेपान व कांतीवान असते, असा सार्थ सार्वत्रिक समज आहे.
आपल्या घरी नारळाचे खोबरे खवून; ‘लोणी कढवून जसे तूप करतो’ असे नारिकेल तेल तयार केल्यास त्यात किंचितही आम्लता नसते. अशा ताज्या नारिकेल तेलात तुपाइतकेच शरीरपोषक गुण असतात.
नारळाच्या कवटीपासून जाळून काढलेले तेल त्वचाविकारांवर उपयुक्त आहे. नारळाचे तेल केश्य, कृमिघ्न, व्रणरोपण, श्लेश्मघ्न, शोषघ्न व कर्षण आहे.
नारळापासून काढलेल्या तेलाचा उत्तम दर्जाचा साबण दक्षिणेत खूप लोकप्रिय असतो.
जून नारळाचा अंगरस खोकला, क्षय व अशक्तपणा दूर होण्यासाठी देतात. त्याने कब्ज मोडतो.
दक्षिणेतील मलबार प्रदेशात नारळापासून अति चविष्ट गूळ बनवण्यात येतो.
आरोग्याच्या टिप्स वाचा एका क्लिकवर click
ज्यांचे केस अकाली गेले आहेत, त्यांनी घरी केलेले नारिकेल तेल, पोटात घेण्यासाठी व केसांना लावण्यासाठी वापरल्यास महिना-दीड महिन्यात उत्तम केस येतात. असा अनेक जणांचा अनुभव आहे.
खूप अवघड शस्त्रक्रियेच्या आधी व नंतरही कोवळय़ा नारळाचे दूध दिल्यास होणारा त्रास कमी होतो.
खूप श्रमाचे काम करणाऱ्या महिलांनी ओले किंवा कोरडे खोबरे खाल्ल्यास त्या आपली गमावलेली ताकद लगेच कमावतात.








































































































































