राहुल गांधींच्या फोननंतर अखेर राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द

भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण; राहुल गांधींशी फोनवर चर्चा झाल्याचा व्हिडिओ चर्चेत

Rahul Bondre's entry into the BJP finally cancelled after a call from Rahul Gandhi.
Rahul Bondre's entry into the BJP finally cancelled after a call from Rahul Gandhi.

बुलढाणा : काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्यानंतर आता या घडामोडींना नाट्यमय वळण मिळाले आहे. राहुल गांधी यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचा व्हिडिओ समोर आला असून, त्यानंतर बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय रद्द केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये चैतन्य पसरले असून त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी झाली आहे. राहुल बोंद्रे यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयामुळे बुलढाणा काँग्रेसमध्ये मोठी राजकीय चर्चा रंगली होती. २२ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार होते.

मात्र, आता राहुल गांधी यांचा थेट फोन आणि बोंद्रे यांच्याशी झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला आहे. या संवादानंतर राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय बदलल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही तासांपूर्वी भाजप प्रवेश निश्चित मानला जात असताना आता तोच प्रवेश रद्द होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी काम केले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी चिखली येथे बोंद्रे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्याचे नियोजनही केले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या फोननंतर बोंद्रे यांनी नेमका कोणता निर्णय घेतला, भाजप प्रवेशाचा कार्यक्रम अधिकृतपणे रद्द झाला आहे का आणि ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत का, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. मात्र, समोर आलेल्या व्हिडिओमुळे बुलढाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here