chhatrapati sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : धोकादायक इमारतींवर मनपाचा बुलडोझर; दोन दिवसांत १० इमारती जमीनदोस्त

शहरातील ४२ जीर्ण व धोकादायक इमारती, अवघ्या २५ मिनिटांत ही इमारत जमीनदोस्त

Chhatrapati Sambhajinagar: Municipal Corporation’s bulldozer targets dangerous buildings; 10 buildings razed in two days.
Chhatrapati Sambhajinagar: Municipal Corporation’s bulldozer targets dangerous buildings; 10 buildings razed in two days.

छत्रपती संभाजीनगर: नागरिकांच्या जीविताला धोका ठरणाऱ्या जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या इमारतींविरोधात छत्रपती संभाजीनगर महापालिकेने chhatrapati sambhajinagar Municipal Corporation कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करत गुरुवारी पाच धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत पाडण्यात आलेल्या धोकादायक इमारतींची संख्या १० वर पोहोचली आहे.

महापालिकेने शहरातील ४२ जीर्ण व धोकादायक इमारती यापूर्वीच घोषित केल्या असून, संबंधित मालकांना वारंवार नोटिसा बजावूनही इमारती निष्कासित करण्यात आल्या नव्हत्या. अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महापालिकेने थेट पाडकामाची मोहीम हाती घेतली आहे.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे. बुधवारी सिटी चौक परिसरातील अत्तर गल्लीतील दोन इमारतींसह विविध झोनमधील पाच धोकादायक इमारती पाडण्यात आल्या होत्या.

गुरुवारी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिराशेजारील बाबूलाल कन्नूलाल आणि गिरधारीलाल तनवाणी यांच्या धोकादायक इमारतींवर जेसीबीद्वारे कारवाई करण्यात आली. अवघ्या २५ मिनिटांत ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर उत्तर मिठाई भांडार परिसर तसेच गुलबहार फुल सेंटरलगतच्या धोकादायक इमारतींवरही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत झोन-१च्या सहायक आयुक्त लता पुजारी, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

शुक्रवारीही कारवाई सुरूच राहणार

अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, दोन दिवसांत १० धोकादायक इमारती पाडण्यात आल्या असून, शुक्रवारी सिटी चौक परिसरातील उर्वरित धोकादायक इमारतींवरही कारवाई केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here