‘ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे’; निवडणूक आयुक्तांना कायद्याचे अभय, मुकुल वासनिकांचा आरोप

निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर काँग्रेसचा सवाल; संविधान रक्षणासाठी संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन

mukul-wasnik-gyanesh-kumar-election-commission-allegations
mukul-wasnik-gyanesh-kumar-election-commission-allegations

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्यादे असून, निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देऊन त्यांच्यावर कारवाई होण्यापासून अभय देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांनी केला. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली. काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.

मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

वासनिक म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि नियुक्ती प्रक्रियेतील समितीतून सरन्यायाधीशांना वगळले. या प्रक्रियेमुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या तरतुदींवरही त्यांनी आक्षेप घेतला. नरेंद्र मोदी संविधान कमकुवत करण्याचे काम करत असल्याचा आरोप करून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘लोकशाही आणि संविधान वाचवण्याची वेळ’

नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी परिवर्तनाची गरज व्यक्त केली. स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोग भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. शेतकरी आत्महत्या, महिला, दलित आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी आणि महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जाण्याच्या मुद्द्यांवरही त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.

महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या पाच दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात गुरुवारी झाली. मुंबई विमानतळावर आगमनानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून टिळक भवन येथे पदग्रहण केले.

३१ डिसेंबरपर्यंत संघटनाविस्ताराचे लक्ष्य

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बूथ, गाव आणि मंडळ स्तरावर काँग्रेस संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे सांगितले. संघटनाविस्ताराचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या तातडीने सुरू करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देणे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांच्या संघर्षाला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले. राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून आमदारकीचे एका वर्षाचे मानधन देण्याची घोषणाही त्यांनी केली.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. माजी मंत्री नसीम खान यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका केली. या वेळी मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनीताई पाटील, यशोमती ठाकूर, नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे, खासदार कल्याण काळे, खासदार प्रतिभा धानोरकर, बाळासाहेब थोरात आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देत आहेत?: हर्षवर्धन सपकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here