छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातील अस्वच्छता, अपुरी देखभाल आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यात होत असलेल्या हलगर्जीपणाची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बसस्थानकाची पाहणी करताना त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी देत प्रवाशांच्या सुविधांबाबत कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सिडको बसस्थानकातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सार्वजनिक प्रसाधनगृहातील अस्वच्छता, अपुरी देखभाल तसेच कर्मचाऱ्यांचा अभाव त्यांच्या निदर्शनास आला. प्रवाशांकडूनही याबाबत तक्रारी करण्यात आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी बाह्य संस्थांची नियुक्ती करण्यात आली असली तरी त्या संस्थांकडून निर्धारित निकषांनुसार काम करून घेणे आणि त्यावर नियमित देखरेख ठेवणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. बाह्य संस्थेला काम दिल्यानंतर अधिकाऱ्यांची जबाबदारी संपत नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“प्रवाशांना स्वच्छता आणि आवश्यक सुविधा मिळत आहेत की नाही, याची नियमित पाहणी करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत उदासीनता अजिबात सहन केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस
सिडको बसस्थानकातील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, कामातील हलगर्जीपणा आणि प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या उदासीनतेबद्दल विभाग नियंत्रक आणि संबंधित आगार व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.
प्रवाशांशी साधला थेट संवाद
पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावर उपस्थित प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रवाशांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा दिसली पाहिजे, अशी भूमिका सरनाईक यांनी मांडली.
‘लालपरी’च्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश
महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटीच्या बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळाले पाहिजे. प्रवाशांच्या सुविधांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिडको बसस्थानकाच्या पाहणीच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “प्रवाशांच्या सुविधांमध्ये हलगर्जीपणा नको, जबाबदारी निश्चित करा आणि तातडीने सुधारणा करा,” असा स्पष्ट संदेश एसटी प्रशासनाला दिला.





















































































































































