Auto rickshaw Strike in Aurangabad :औरंगाबादेत बेमुदत रिक्षा बंद,संघटनांमध्ये फूट!

mumbai-auto-taxi-fare-hike-september-2026
mumbai-auto-taxi-fare-hike-september-2026

औरंगाबाद : औरंगाबादेत २ ऑक्टोबरपासून रिक्षाची भाडेवाढ लागू करण्यात आली. रिक्षात बसताच पहिल्या दीड कि.मी. अंतरासाठी २६ रुपये मोजावे लागत आहेत. रिक्षाचालकांनी मीटर अद्ययावतीकरण (कॅलिब्रेशन) केलेले नाही. कॅलिब्रेशनसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदतवाढ आज बुधवार (३० नोव्हेंबर) रोजी संपणार आहे. गुरुवार १ डिसेंबरपासून रिक्षा तपासणीची मोहिम राबवण्यात येणार आहे. नवीन दरानुसार मीटर कार्यरत नसलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा प्रादेशिक परिवह विभागाने दिला होता. मात्र, रिक्षा संघटनांनी २८ मार्चपर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. ती न मिळाल्यामुळे गुरुवारपासून बेमुदत रिक्षा बंदची हाक औरंगाबाद रिक्षा चालक-मालक कृती समितीने दिली. तर रिक्षा चालक संयुक्त कृती महासंगाने बंदमध्ये सहभागी होणार नाही असे जाहीर केले.

महागाई, इंधनाचे वाढलेले दर यामुळे रिक्षाचालकांकडून होणाऱ्या मागणीचा विचार करून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाच्या भाड्यात २३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी घेतला होता. दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रवाशांना २६ रुपये मोजावे लागणार आहेत, तर पुढील प्रत्येकी १ कि.मी.साठी १८ रुपये मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात ‘जवळपास ३६ हजार रिक्षा आहेत. त्यापैकी २३ हजारापेक्षा जास्त रिक्षा औरंगाबाद शहरात चालतात.

ऑक्टोबरपासून सुधारित भाडेवाढ लागू करण्यात आल्यानंतर रिक्षाचालकांना मीटर अद्ययावत करण्याचे सांगण्यात आले. यासाठी प्रतिरिक्षा सातशे व मीटरमधील इतर दुरुस्तीसाठी शंभर ते तीनशे रुपये खर्च करावा लागणार आहे. अवाजवी शुल्क आकारणीला रिक्षाचालकांकडून विरोध करण्यात आला. अद्यापही रिक्षा चालकांनी कॅलिब्रेशन केले नसल्याचे एकूण चित्र आहे.

रिक्षा तपासणी मोहीम सुरुच राहणार…

रिक्षा तपासणीची मोहीम सुरुच राहणार आहे. रिक्षा संघटनांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत मीटर कॅलिब्रेशनसाठी वेळ दिला आहे. बुधावारी विविध रिक्षा संघटनांच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. यामध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परंतु नियम तोडणा-या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

आम्हाला २८ मार्च पर्यंत मुदतवाढ हवी….

रिक्षांचे इन्शुरन्स, पीयुसी, टॅक्स,मीटर कॅलिब्रेशन, फिटनेस, वाहन पासिंग करण्यासाठी २८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळाली तर सर्वांना आधार मिळेल. रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल होत असल्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या कृती समितीच्या वतीने गुरुवारपासून बेमुदत बंद राहिल.

सलिम खामगांवकर, अध्यक्ष रिक्षा चालक-मालक कृती समिती

या रिक्षा संघटनांचा बंदमध्ये सहभाग…

बहुजन हिताय रिक्षा चालक, शिव वाहतूक सेना, वस्ताद वाहतूक दल, रोशन ऑटो युनियन, अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी रिक्षा चालक-मालक संघटना,  वाय.एफ.खान रिक्षा संघटना, परिवर्तन ऑटो चालक-मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना, काँग्रेस रिक्षा युनियन, पँथर पॉवर रिक्षा चालक-मालक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, मराठा मावळा संघटना, रिपाइं चालक- मालक संघटनांचा बंदमध्ये सहभाग असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here