
छत्रपती संभाजीनगर:देशातील बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि न्यायव्यवस्थेवर तीव्र टीका करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक Cockroach Janta Party अभिजित दिपके Abhijeet Dipke यांनी बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा प्रश्न असल्याचे म्हटले. “देशातील ८० टक्के सुशिक्षित बेरोजगारांकडे पदव्या आहेत, मात्र त्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुणांना शिकून चूक केली का, असा प्रश्न पडत आहे,” असे ते म्हणाले.
दिपके यांच्या मते, बेरोजगारी हा आगामी निवडणुकांमधील प्रमुख राजकीय मुद्दा बनवला जाईल. “देशातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न कोणालाही दुर्लक्षित करता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबरमध्ये ‘क्या बोलती पब्लिक’ राष्ट्रीय अभियान
कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबरपासून ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने देशव्यापी अभियान सुरू करणार असल्याची माहिती दिपके यांनी दिली. या अभियानाद्वारे देशभर दौरा करून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि शासनाबद्दलच्या भावना जाणून घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण महाग, पालकांवर आर्थिक ताण
शिक्षणाचा वाढता खर्च हा गंभीर विषय असल्याचे सांगताना दिपके म्हणाले की, खासगी शाळांची फी, डोनेशन, महाविद्यालयीन शुल्क आणि कोचिंग क्लासेसच्या खर्चामुळे सामान्य कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. “आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्जाचा बोजा घेण्यासारखे झाले आहे,” असा दावा त्यांनी केला.
न्यायव्यवस्था आणि राजकीय घडामोडींवरही प्रश्न
राजकीय पक्षांतील फोडाफोडी, तपास यंत्रणांचा वापर आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबतही दिपके यांनी प्रश्न उपस्थित केले. सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी विलंब होतो, तर काही प्रकरणांमध्ये जलद सुनावणी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचेही ते म्हणाले



















































































































































