औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने औरंगाबाद नामांतराला पाठिंबा दिला असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० पदाधिका-यांनी बुधवार (8 मार्च) रोजी पत्रकार परिषद घेऊन पक्षाला रामराम ठोकला. सामुहिक राजीनामा पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, संपर्क मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठविले. पदाधिका-यांच्या राजीनाम्यामुळे शहरात पक्षाला मोठा झटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे, अशी आमची भावना होती. त्यामुळे आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो. परंतु नामांतरास समर्थन दिल्यामुळे आमची ही भावना संपली आहे. आमच्यासोबत पक्ष न्याय करू शकत नाही असा आमचा विश्वास झाला. या कारणामुळे आम्ही शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १० पदाधिकारी आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातील ४० पदाधिकारी अशा एकूण ५० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. असे पदाधिका-यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
राजीनामा पत्रावर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जावेद खान, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनवर अली खान, समीर मिर्झा, सय्यद सत्तार, कलीम शेख, आफताब खान, अशफाक पटेल यांच्यासह ५० पदाधिका-यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
काही दिवसांपूर्वीच माजी शहराध्यक्ष विजय साळवे यांचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शिवसेनाच्या गळाला लागला. त्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून शिवसेनेत प्रवेश केला. आता तिस-या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला.
पुन्हा एक मोठा गटही बाहेर पडणार…
राष्ट्रवादीचे बडे नेते राजीनाम्याच्या तयारी असून लवकरच ते आपली भूमिका जाहीर करणार आहे. यासाठी एक बैठक सुध्दा पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बड्या पदाधिका-यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. मोठा गट बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस शहराध्यक्षांनीही दिला होता राजीनामा..
नामांतर प्रकरणावरून काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसची दुटप्पी भूमिका मान्य नाही. अशी भूमिका घेत औरंगाबाद नामांतर प्रकरणावरून न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. सध्या औरंगाबाद नामांतराचा विषय न्याय प्रविष्ठ असून हिशम उस्मानी न्यायालयीन लढाई लढत आहेत.