मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री कदम यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री कदम घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत. थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर राज्यंत्री कदम यांनी गुरुवारी करोना चाचणी केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यमंत्री कदम यांनी मागील दोन-तीन दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांना त्यांनी चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास असल्याचंही ते म्हणाले आहेत.
संसर्गातून बरा झाल्यानंतर सेवेत पुन्हा रुजू होईन
वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मी देखील फोनद्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन. माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या योजना, कोरोना रोखण्यास उपाययोजना, मंत्रालय बैठका, भंडारा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज… संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास!









































































































































