खाकीत काम करणारे घटक समाजासाठी महत्त्वाचे : शरद पवार

संदीप काळे यांच्या "ट्‌वेल्थ फेल' पुस्तकाचे शरद पवार, अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन

Factors working in khaki are important for the society: Sharad Pawar
Factors working in khaki are important for the society: Sharad Pawar

मुंबई : मुंबई असो की महाराष्ट्र, देश, आपण सुरक्षित आहोत, आपण आनंदाने बागडतोय त्याचे कारण दक्ष असणारा पोलिस विभाग आहे. आपल्या अवतीभवती खाकीत काम करणारा प्रत्येक घटक समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. पोलिस अधिकारी होण्याच्या पूर्वी यातील काही घटकांचा प्रवास इन्स्पायर करणारा असतो. “ट्‌वेल्थ फेल’च्या निमित्ताने तरुण पिढी समोर असाच एक इन्स्पायर करणारा प्रवास येतोय, हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे, असे उद्‌गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले आहेत.

आयपीएस मनोजकुमार शर्मा यांच्यावर आधारित असलेल्या अनुराग पाठक यांच्या “ट्‌वेल्थ फेल’ या हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद पत्रकार, लेखक संदीप काळे यांनी केला आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या “ट्‌वेल्थ फेल’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची उपस्थिती होती. पवार यांनी यावेळी गृह खात्यामध्ये असलेल्या अनेक वेगळ्या अधिकाऱ्याचा उल्लेख करत हे सगळे अधिकारी समाजमनाचा आरसा कसे होते, याची अनेक उदाहरणे दिली.

पोलिस अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली लोकांना माहिती नसते. मुंबईमध्ये तर ही कार्यप्रणाली खूप अवघड आणि जिकिरीची असते. जबाबदाऱ्या, यातना, कर्तृत्व या सगळ्या विषयाला न्याय देता देता किती वेळा कुठल्या कुठल्या अडचणीला सामोरे जावे लागते हे सांगता येत नाही, असे सगळे चित्र असते. नामांतराच्या काळामध्ये पोलिस अधिकाऱ्याने बजावलेली भूमिका समाजव्यवस्था टिकून राहण्यासाठी, युवकांची मानसिकता शाबूत राहण्यासाठी किती महत्त्वाची होती याचे उदाहरण ही शरद पवार यांनी यावेळी दिले. 46 वर्षांपूर्वी मी गृह खात्यामध्ये होतो, चार वेळा गृहखाते माझ्याकडे होते, त्यावेळी पोलिसांच्या प्रत्येक जडणघडणीचा साक्षीदार मला होता आले. पोलिसांची प्रतिमा खराब करण्याच्या दृष्टीने हल्ली पावले उचलली जातात. हे पावले निश्चिळतच समाजासाठी घातक आहेत.

पोलिस विभाग नेहमी लक्षात राहील असे काम करतो, असेही ते यावेळी म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिस दलामध्ये काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, अनेकांच्या कामांमधून तरुणाई इन्स्पायर होत असते, असे मत व्यक्त केले. प्रा. प्रतिभा बिस्वास यांच्या पोलिस नभोमंडळातील “21 आयपीएस नक्षत्र’ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, ज्येष्ठ लेखिका, साहित्य संघाच्या कार्यवाह उषा तांबे, संदीप काळे, लेखिका प्रा. प्रतिभा बिस्वास यांचीही यावेळी भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here