comrade : ज्येष्ठ कामगार नेते उद्धव भवलकर यांचा कोरोनाने घेतला बळी!

Uddhav bhawalkar- comrade- passes away-due- to -corona
Uddhav bhawalkar- comrade- passes away-due- to -corona

औरंगाबाद : सीटूचे ज्येष्ठ नेते आणि कामगार चळवळीतील लढाऊ नेते कॉम्रेड उध्दव भवलकर यांचे शनिवारी दुपारी दोन वाजता कोरोनामुळे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. औरंगाबाद जिल्ह्यात, मराठवाड्यात सीटू संघटना मजबूत करण्यासाठी व कामगार चळवळ धारदार बनवण्यासाठी काम्रेड भवलकर यांचे योगदान लक्षणीय होते.

काम्रेड भवलकर लढाऊ कामगार नेते होते. शेतकरी- कामगार- शेतमजूर यांची एकजूट झाली पाहिजे यावर त्यांचा भर होता. भवलकर हे विद्यार्थीदशेपासूनच डाव्या चळवळीत सक्रिय होते. कामगारांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती.

कॉ.भवलकर औरंगाबादेत कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असून अंत्यसंस्काराच्या वेळेला फक्त चार नातेवाईक किट घालून स्मशानभूमीत प्रवेश करू शकतील. स्मशानभूमीच्या बाहेर फक्त ५० व्यक्तीना येण्याची परवानगी आहे, असे डॉ. डी.एल. कराड यांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील सीटू, कामगार चळवळ आणि डाव्या चळवळीचीही मोठी हानी झाली आहे.

महाराष्ट्रात कॉ. भवलकरांच्या पुढाकाराने विद्यार्थी संघटनेची स्थापना

कॉ. भवलकर यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील लाखणगाव येथे झाला होता. त्यांनी भौतिकशास्त्रात एमएस्सी संपादन केली होती. महाराष्ट्रामध्ये एसएफआय या डाव्या चळवळीच्या विद्यार्थी संघटनेची स्थापना कॉ. भवलकर यांच्याच पुढाकाराने झाली होती. त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे आयोजित राज्य अधिवेशनात एसएफआयची मुहूर्तमेढ रोवली गेली.

१९७४ च्या मराठवाडा विकास आंदोलनात  जे आघाडीचे नेते होते त्यात कॉ. भवलकर, प्रा. डॉ. विठ्ठल मोरे, गोपीनाथ मुंडे, प्रताप बांगर आदींचा समावेश होता. मराठवाडा विकास आंदोलनाचाच भाग म्हणून मराठवाड्यात परीक्षांवर बहिष्काराचे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनातील आघाडीच्या नेतृत्वात कॉ. भवलकरही होते.

कॉ. भवलकर यांच्याच पुढाकाराने औरंगाबादेत सीटूची स्थापना झाली

१९८७ मध्ये कॉ. भवलकर यांच्याच पुढाकाराने औरंगाबादेत सीटूची स्थापना झाली. याच वर्षी त्यांच्यावर खूनी हल्लाही झाला होता. सीटूच्या स्थापनेबरोबरच मराठवाड्यात कामगार चळवळीचा दबदबा निर्माण झाला. त्याचे श्रेयही कॉ. भवलकर यांच्याकडेच जाते.

सीटूच्या नेतृत्वात कामगारांचे मोठे आंदोलन झाले होते

१९८९ मध्ये पैठण औद्योगिक वसाहतीतील ऍरिस्टोक्रॅट कंपनीत सीटूच्या नेतृत्वात कामगारांचे मोठे आंदोलन झाले होते. हे आंदोलन एवढे चिघळले की, कामगारांनी ऍरिस्टोक्रॅट कंपनीच्या मॅनेजरचा खून केला. त्यावेळी या कंपनीतील ७३ कामगारांविरुद्ध महाराष्ट्रात पहिल्यांदा टाडा हा अतिरेक्यांसाठीचा कायदा लावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here