“मुख्यमंत्र्यांच्या BKC मधल्या भाषणाची स्क्रीप्ट BJP, RSS ने लिहून दिली”

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मीटकरी (Amol Mitkari) यांनी भाषणाची स्क्रीप्ट ही भाजपाची (BJP) असल्याचा टोला लगावला आहे.

amol-mitkaris-criticism-of-bjp-over-the-renaming-of-aurangabad-osmanabad-news-update
amol-mitkaris-criticism-of-bjp-over-the-renaming-of-aurangabad-osmanabad-news-update

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसीच्या मैदानावर पार पडला. या मेळाव्यातील भाषणामध्ये शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं. त्याप्रमाणे शिंदेंनी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही (NCP) सडकून टीका केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान असल्याचंही शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या याच भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मीटकरी (Amol Mitkari) यांनी भाषणाची स्क्रीप्ट ही भाजपाची (BJP) असल्याचा टोला लगावला आहे.


दसऱ्याच्या दिवशी सकाळीच पंकजा मुंडे यांचा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मिटकरींनी भाजपाला टोला लगावला होता. ट्वीटरवरुन त्यांनी ‘भाजपाचा केमिकल लोच्या झाला आहे,’ असं म्हटलं होतं. भाजपाला पंकजा मुंडे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातही स्थान मिळालं नाही असा टोला मिटकरींनी लगावला होता. “एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा ‘केमिकल लोच्या’ झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपारूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की,” असं ट्वीट मिटकरींनी केलेलं.

 मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच मिटकरींनी ट्वीटरवरुन शिंदेंना टोला लगावला. रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी केलेल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी, “मुख्यमंत्री महोदयांचे आजचे बीकेसी मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट. या भाषणात नरेंद्रजी मोदी, आरएसएस व भारतीय जनता पार्टीवर स्तुती सुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही,” असा टोलाही लगावला.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबरोबरच आदित्य ठाकरेंवरही टीका करताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकल्याचं दिसून आलं. एकूणच शिंदेंचं भाषण आणि त्यामधील मुद्दे पाहता भविष्यात शिंदे गटाची वाटचाल भाजपासोबतच असणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here