MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करा !: अतुल लोंढे

MPSC एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा.

Implement the change in MPSC State Services Main Exam from 2025!: Atul Londhe
Implement the change in MPSC State Services Main Exam from 2025!: Atul Londhe

पुणे/मुंबई : लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना काही वेळ मिळायला हवा याचा विचार करुन या निर्णयाची अंमलबजावणी २०२३ पासून न करता २०२५ पासून करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज राज्यातील प्रमुख शहरात आंदोलन केले. पुण्यात अलका टॉकीज चौकातील आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सहभाग घेतला. आंदोलनाकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन नंतर विभागीय आयुक्त यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, आयोगाने बदललेल्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी चार ते पाच वर्षापासून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार करत आहेत. नव्या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. या नव्या बदलाला आत्मसात करून त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही. बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे तीन-चार वर्षापासून बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे.

महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम युपीएससीच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. त्यांना तयारीसाठी शहरात राहून कोचिंग क्लास करणा-या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे परंतु आयोगाच्या निर्णयामुळे तो मिळणार नाही हा त्यांच्यावर अन्याय ठरेल. आधीच कोरोनामुळे दोन वर्ष परीक्षा झाली नव्हती. परीक्षा पद्धतीमधील बदल २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेताना गेली चार ते पाच वर्ष वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित आयोगाने विचारात घेतलेले दिसत नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २१ जुलै रोजी वर्णनात्मक परीक्षेचा इंग्रजीमधील अभ्यासक्रम जाहीर केला त्यानंतर तीन महिन्यांनी १७ ऑक्टोबरला मराठीमध्ये अभ्यासक्रम जाहीर केला. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा ४ जून रोजी आयोजित केली आहे परंतु आजपर्यंत तांत्रिक सेवा ज्यामध्ये वनसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी कृषी सेवा या परीक्षांच्या मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रम जाहीर झालेला नाही.

परीक्षा अवघ्या सहा महिन्यावर आल्या असताना अद्यापही आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला नसल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हा एक प्रश्न आहे. परीक्षा पद्धती मधील बदल ही काळाची गरज आहे मात्र नव्या पद्धतीप्रमाणे तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ हवा आहे. आयोगाने विद्यार्थ्यांना येणा-या या अडचणी लक्षात घेतल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पद्धतीमधील बदल २०२५ पासून लागू करावा अशी मागणी काँग्रेस पक्ष करत आहे, असे लोंढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here