मुंबई: मायनॉरिटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे नेते माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम आरक्षणासाठी (Muslim Reservation) आमखास मैदान औरंगाबाद ते मंत्रालयापर्यंत पायी लाँगमार्च काढण्यात आला होता. लॉंगमार्च पथकाने गुरुवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन मुस्लिम आरक्षणासंदर्भात चर्चा केली. आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले.
जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली १३ ऑक्टोबर रोजी जामा मशीदीसमोरील आमखास मैदान औरंगाबाद येथून लॉंग मार्चला सुरुवात करण्यात आली होती. पदयात्रेत विविध गावे, तालुका, जिल्ह्यांमध्ये लाँग मार्च पथकातील सदस्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी छोटेखानी सभा घेण्यात आली. कुरैशी यांनी नागरिकांना मुस्लिम आरक्षणाचे महत्त्व विशद केले.
४० पानांचे निवेदन सादर…
मुंबईत पथक पोहोचल्यावर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेसाठी बोलावले. ४० पानांचे निवेदन त्यांना देण्यात आले. ६ नोव्हेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार विक्रम काळे, संघटक शेख मसूद, साजीद पटेल, अब्दुल हफीज अली, शेख आमीर, मतीन पटेल, राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्लाह आदींची उपस्थिती होती.