मुंबई : एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवून राज्य सरकारच्या अर्थ विभागाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बुधवारी दिला. ३ नोव्हेंबरपर्यंत निधी न मिळाल्यास ४ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाची सवलत मूल्याची थकबाकी, दैनंदिन खर्चासाठी आवश्यक अतिरिक्त निधी आणि कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीची रक्कम तातडीने देण्याची मागणी संघटनेने केली आहे. सरकारकडे निधीची मागणी केल्यानंतर अर्थ विभागाकडून वारंवार अडथळे आणले जात असल्याचा आरोप बरगे यांनी केला. कर्मचाऱ्यांची दिवाळी खारट करणाऱ्या सरकारला प्रतीकात्मक स्वरूपात खारा फराळ पाठवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
१,०१५ कोटींची मागणी; प्रत्यक्षात ३८० कोटी
एसटी महामंडळाने सप्टेंबर महिन्याचे वेतन आणि थकीत देणी भागविण्यासाठी सरकारकडे १,०१५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सरकारकडून केवळ ३८०.०६ कोटी रुपये मिळाल्याचा दावा बरगे यांनी केला. त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पीएफ, ग्रॅच्युइटीची रक्कमही थकीत
कर्मचाऱ्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांतील ५,७४० कोटी रुपयांहून अधिक देणी थकीत असल्याचे बरगे यांनी सांगितले. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि उपदानाची (ग्रॅच्युइटी) सुमारे ३,३५० कोटी रुपयांची रक्कम संबंधित ट्रस्टकडे जमा करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांतील सुमारे १,५०० कर्मचाऱ्यांची जवळपास ७५ कोटी रुपयांची पीएफ आगाऊ रक्कमही प्रलंबित असल्याचे ते म्हणाले.
वाढीव महागाई भत्ता, वेतनवाढीतील फरक आणि अन्य देयकांची थकबाकी यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अलीकडील वेतनवाढीच्या फरकापोटी ५३८.८३ कोटी रुपये कागदावर मंजूर झाले असले, तरी ही रक्कम महामंडळाला अद्याप मिळालेली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
एसटीचे प्रवासी उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळत नसताना कर्मचारी देणी आणि दैनंदिन खर्चाचा ताण वाढत आहे. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक व्यवहार सांभाळणे कठीण होत असल्याचे बरगे यांनी सांगितले. थकीत देणी तातडीने द्यावीत, अन्यथा कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढून औद्योगिक अशांतता निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.





























































































































































