मुंबई : दोन दिवसांपासून कोरोना बाधित, ओमीक्रॉन रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन पालिका आणि पोलिसांनी मास्कविना फिरणाऱ्या बेजबाबदार मुंबईकरांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. रेल्वे प्रशासन मात्र कारवाईबाबत उदासीन असल्याचे आढळले आहे. पालिका आणि पोलिसांनी सात हजारांहून अधिक व्यक्तींवर कारवाई करण्यात आली, तर तिन्ही रेल्वे मार्गावर एकावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तसेच ओमायक्रॉन बाधितांची संख्याही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रात्रीच्या वेळी संचारबंदी जारी करण्यात आली आहे.
तसेच मास्कचा वापर, हातांची स्वच्छता आणि अंतर नियमाचे पालन करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही महिन्यांपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने मुखपट्टीचा वापर करण्याचा काही मुंबईकरांना विसर पडला आहे. आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे.
७ हजार ४५१ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई
मुंबईत २५ डिसेंबरला ठिकठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या ५ हजार ३७३ जणांवर पालिकेने, तर २ हजार ७६ जणांवर पोलिसांनी अशा एकूण ७ हजार ४५१ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. एका दिवसात १४ लाख ८९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ४१ लाख ५६ हजार २९६ जणांविरुद्ध कारवाई करुन एकूण ८२ कोटी ६४ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.