मुंबई: सचिन वाझे Sachin vaze प्रकरणी वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parambir singh यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे Hemant Nagrale यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याचवेळी त्यांनी विरोधकांना सूचक इशारा देखील दिल्याचे दिसून येत आहे.
“मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल, या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा.”असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. @AnilDeshmukhNCP @OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 17, 2021
सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर आज महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
हेही वाचा: परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
दरम्यान, या अधिकाऱ्यांसोबतच इतरही पोलीस अधिकाऱ्यांची बदली देखील करण्यात आली आहे. यसंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर परमबीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे १९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी याआधी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तसेच महाराष्ट्राच्या महासंचालकपदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.



















































































































































































