मुंबई : शिवसेना (ShivSena) कुणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आज सोमवारी सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढील सुनावणीमध्येही निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा विचार होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला असून ४० आमदार, १२ खासदार आणि अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, काही आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. शिंदे व ठाकरे गटाने आपल्या दाव्यांच्या पुष्टय़र्थ लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आणि आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले सादर केले आहेत.
आयोगाने कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलेली २३ नोव्हेंबरची मुदत संपल्यावर कागदपत्रांची छाननी केली असून सोमवारपासून होणाऱ्या सुनावणीत युक्तिवाद सुरू होतील. ते पूर्ण झाल्यावर आयोगाचा निकाल एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहेत. त्यादृष्टीने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार, हे महत्त्वाचे आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी आयोगाने अंतरिम आदेश जारी करून ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव व मशाल निवडणूक चिन्ह आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव व ढाल-तलवार निवडणूक चिन्ह दिले होते. दोन्ही गटांनी दावा केल्याने आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठविले होते.