विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा सरकारचा हेतू !: हुसेन दलवाई

Govt's intention to oppose inter-faith marriage under marriage coordination committee!: Hussain Dalwai
Govt's intention to oppose inter-faith marriage under marriage coordination committee!: Hussain Dalwai

मुंबई:महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis) सरकार महिलांप्रति काळा कायदा आणू इच्छिते, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व या कायद्याला समस्त महिलावर्गाने विरोध करावा असा आग्रह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

यासंदर्भात हुसेन दलवाई म्हणाले की, जोपर्यंत कोणी तक्रार करत नाही तोपर्यंत असा हस्तक्षेप करणे म्हणजे फॅसिस्ट कृती असून घटनाविरोधी आहे. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह जाती निर्मूलनाचा उपाय असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्यांना संरक्षण देण्याऐवजी नवऱ्याने फूस लावून पळवले अशा तक्रारी करणाऱ्या आई वडिलांना मदत करणे हा या समितीचा प्रचंड हेतू असल्याचे स्पष्ट दिसते.

स्त्रियांविषयी इतका कळवळा दर्शविणाऱ्यांनी बिल्किश बानूच्या गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी का केली नाही? महाराष्ट्रामध्ये एकाच जातीत व आई वडिलांच्या संमतीने विवाह केलेल्या लाखो परितक्त्या आहेत, त्यांना संरक्षण देण्याची सरकार योजना का करत नाही? कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा करण्यात आला परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा व नियम कधी करणार आहात. वरील सर्व बाबींबाबत दखल न घेता आंतरधर्मीय विवाहाला विरोध करणे हा यामागचा अंतस्थ हेतू आहे, अशी जळजळीत टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here