TRP SCAM : अर्णब गोस्वामींविरोधातील मानहानीचा दावा परमबीर यांच्याकडून विनाअट मागे

param-bir-singh-unconditionally-withdraw-defamation-suit-against-Republic-tv-arnab-goswami-news-update-today
param-bir-singh-unconditionally-withdraw-defamation-suit-against-Republic-tv-arnab-goswami-news-update-today

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे (Republic tv) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि वाहिनीची मालकी असलेल्या ‘एआरजी आउटलियर मीडिया’विरुद्ध दाखल केलेला मानहानीचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी बुधवारी विनाअट मागे घेतला. त्यानंतर न्यायालयाने गोस्वामी यांच्या वकिलाच्या मागणीनंतर परमबीर यांना १५०० रुपयांचा दंड सुनावला व दंडाची रक्कम गोस्वामी यांना देण्याचे आदेश दिले.

टीआरपी घोटाळय़ावरील वृत्तामध्ये वाहिनीने आपली प्रतिमा मलीन केल्याचा दावा परमबीर यांनी केला होता. तसेच गोस्वामी आणि कंपनीविरोधात मानहानीचा दावा दाखल करून ९० लाख रुपयांच्या भरपाईची मागणीही केली होती.

या प्रकरणी गोस्वामी यांनी गेल्याच आठवडय़ात दिवाणी प्रक्रिया संहितेअंतर्गत शहर दिवाणी न्यायालयात अर्ज करून परमबीर यांची तक्रार फेटाळण्याची मागणी केली होती. हा अर्ज बुधवारी सुनावणीसाठी आला असता गोस्वामी आणि कंपनीविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा विनाअट मागे घेत असल्याचे परमबीर यांच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. गोस्वामी यांची बाजू मांडणारे अधिवक्ता प्रदीप गांधी यांनी मात्र अशा प्रकारे दावा मागे घेणे हा वादावरील तोडगा म्हणून गृहीत धरले जाऊ नये, असे न्यायालयाला सांगितले. दावा मागे घेणाऱ्या परमबीर यांना दंड आकारण्यात यावा अशी मागणी गांधी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here