स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी – राज्य निवडणूक आयुक्त

मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला.

Opportunity to register and amend the voter list for local body elections - State Election Commissioner
Opportunity to register and amend the voter list for local body elections - State Election Commissioner

मुंबई l स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिले.

भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत  मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते.

त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृत, दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. 

देशपांडे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात.

मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक 7 भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.

कुरुंदकर यांनी सांगितले की, आगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे.

याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहे; तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here