मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक सुविधांच्या विकासासाठी सीएमआयए आग्रही

- छत्रपती संभाजीनगर–परभणी व छत्रपती संभाजीनगर–अंकाई दुहेरीकरणाला गती देण्यासह बिडकीन आणि पोटूळ येथे मालवाहतूक केंद्रे विकसित करण्याची मागणी

CMIA urges development of rail connectivity and freight facilities in Marathwada
CMIA urges development of rail connectivity and freight facilities in Marathwada

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी, मालवाहतूक क्षमता आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) यांच्या वतीने करण्यात आली. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत हैदराबाद येथे 9 ऑक्टोबर रोजी आयोजित उच्चस्तरीय चर्चेत सीएमआयएने उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि प्राधान्यक्रम मांडले.

या चर्चेला दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती इती पांडे, दक्षिण किनारपट्टी रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री के. संबाशिव राव तसेच रेल्वे बोर्ड, दक्षिण मध्य रेल्वे आणि विविध विभागीय रेल्वे कार्यालयांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये वाणिज्य, परिचालन आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या चर्चेमध्ये सीएमआयएच्या वतीने अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत यांनी रेल्वे विकासासाठी आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले छत्रपती संभाजीनगर, ऑरिक सिटी, शेंद्रा, बिडकीन, वाळूज आणि जालना परिसरात औद्योगिक गुंतवणूक व उत्पादन क्षमता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या मालाची आवक आणि तयार उत्पादनांची देशांतर्गत बाजारपेठा तसेच बंदरांकडे होणारी जावक यासाठी सक्षम रेल्वे नेटवर्क उभारणे आवश्यक आहे.

रेल्वे मालवाहतुकीचा अधिक प्रभावी वापर झाल्यास उद्योगांचा वाहतूक खर्च कमी होईल, पुरवठा साखळी सक्षम होईल आणि मराठवाड्यातील उद्योगांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढेल. त्यामुळे रेल्वे पायाभूत सुविधांचे नियोजन औद्योगिक मागणी वाढल्यानंतर नव्हे, तर औद्योगिक विकासाच्या आधी किंवा त्याच्याबरोबर होणे गरजेचे असल्याचे सीएमआयएने अधोरेखित केले.

सीएमआयएने मांडलेल्या प्रमुख मागण्या
१. रेल्वे दुहेरीकरणाला हवी गती
छत्रपती संभाजीनगर–परभणी आणि छत्रपती संभाजीनगर–अंकाई  रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील रेल्वे वाहतूक क्षमता वाढविण्यास आणि उत्तर-दक्षिण मालवाहतूक अधिक सक्षम करण्यास मदत होईल.
२.ऑरिक सिटी–शेंद्रा–बिडकीन रेल्वे कनेक्टिव्हिटी
वेगाने विकसित होत असलेल्या औद्योगिक पट्ट्यासाठी समर्पित रेल्वे मालवाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला. यामुळे औद्योगिक उत्पादनांची वाहतूक अधिक सुलभ आणि किफायतशीर होऊ शकेल.
३. बिडकीन येथे समर्पित मालवाहतूक टर्मिनल
बिडकीन औद्योगिक क्षेत्र आणि ऑरिक सिटीच्या गरजा लक्षात घेऊन समर्पित मालवाहतूक टर्मिनल विकसित करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे कच्च्या मालाची आवक आणि तयार उत्पादनांची जावक कार्यक्षम पद्धतीने हाताळता येईल.
४. पोटूळ गतिशक्ती कार्गो टर्मिनल कार्यान्वित करणे
पोटूळ येथील गतिशक्ती कार्गो टर्मिनल कार्यान्वित करून छत्रपती संभाजीनगर, ऑरिक सिटी, वाळूज आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रांसाठी महत्त्वाचे प्रादेशिक मालवाहतूक केंद्र विकसित करण्याची मागणी करण्यात आली.
५. जालना ड्राय पोर्ट ते बंदरांपर्यंत एकात्मिक रेल्वे नेटवर्क
जालना ड्राय पोर्ट, ऑरिक सिटी, छत्रपती संभाजीनगर आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण तसेच वाढवण बंदर यांना जोडणारे एकात्मिक रेल्वे-मालवाहतूक नेटवर्क विकसित करण्यावर भर देण्यात आला. या संपर्कामुळे निर्यातदारांना बंदरांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी अधिक कार्यक्षम वाहतूक पर्याय उपलब्ध होऊ शकतील.
६. मालवाहतुकीच्या आवक-जावकेचे एकात्मिक नियोजन
स्टील, ॲल्युमिनियम, यंत्रसामग्री, बॅटरी, रसायने आणि औद्योगिक घटक यांच्या आवकेसाठी, तसेच मोटारगाड्या, विद्युत वाहने, वाहनांचे सुटे भाग, औषधनिर्मिती व अभियांत्रिकी उत्पादनांच्या जावकेसाठी रेल्वे क्षमतेचे नियोजन करण्याची आवश्यकता सीएमआयएने मांडली.
७. छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे रेल्वे मार्ग
पुणे, रांजणगाव, चाकण आणि दिघी बंदराच्या दिशेने औद्योगिक संपर्क वाढविण्यासाठी प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आणि सविस्तर प्रकल्प अहवालाच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
८. औद्योगिक संघटनांच्या कार्यकारी समित्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व
रेल्वे प्रशासन आणि औद्योगिक संघटनांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी औद्योगिक संघटनांच्या कार्यकारी समित्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रस्ताव सीएमआयएने मांडला.

पीएम गतिशक्तीअंतर्गत औद्योगिक व लॉजिस्टिक्स क्षेत्र म्हणून विकासाची गरज
छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील वाढती औद्योगिक क्षमता, गुंतवणूक आणि निर्यातीच्या संधी लक्षात घेता या क्षेत्राला पीएम गतिशक्तीअंतर्गत महत्त्वाचे औद्योगिक व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित करण्याची आवश्यकता सीएमआयएने मांडली. रेल्वे दुहेरीकरण, औद्योगिक रेल्वे कनेक्टिव्हिटी, मालवाहतूक टर्मिनल्स आणि बंदरांपर्यंतचा संपर्क यांचे एकात्मिक नियोजन केल्यास मराठवाड्यातील उद्योगांचा लॉजिस्टिक्स खर्च कमी होण्यास, उत्पादनांची वाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास आणि निर्यातवाढीस मदत होईल.

बँकेत खाते उघडण्यासाठी किती वय असावे? मुलांच्या खात्याबाबत RBIचा महत्त्वाचा नियम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here