मी ठरल्याप्रमाणं नांदेडपासून तब्बल दीडशे किलोमीटरचं अंतर कापून किनवटमध्ये पोहोचलो. तब्बल दहा वर्षांनंतर मी किनवटमध्ये जात होतो. बाबा आमटे यांच्या ‘ भारत जोडो” यात्रेच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन एक उच्चशिक्षित तरुण, म्हणजे डॉ. अशोक इथल्या आदिवासी भागातच काम करायचं म्हणून १९९३ ला दवाखाना सुरू करतो. त्या भागामध्ये, तो देवदूतच असल्याची कीर्ती सगळीकडं पसरते. लाखो आदिवासी बांधव त्याला आदरानं मान देऊ लागतात. बिलकूलच विकसित नसलेल्या, शंभर टक्के आदिवासी भागात एवढं मोठं काम उभं करणं तसं सोपं नव्हतं.
मी किनवटला पोहोचलो. पंधरा वर्षांपूर्वी मी जो दवाखाना, जसा पाहिला होता, तसाच अजून होता. बैलगाडीनं, रिक्षानं आलेल्या अनेक रुग्णांची तपासणी करण्यात डॉ. अशोक बेलखोडे सर (९८२२३१२२१४) दंग झाले होते. मी आल्याचा निरोप त्यांना मिळाल्यावरसुद्धा तीन तासांनंतर ते मला भेटायला येऊ शकले. दहा मिनिटं माझ्याशी बोलले आणि पुन्हा दवाखान्यात गेले. हाडाचा कार्यकर्ता आणि हुशार डॉक्टर एवढीच डॉ. अशोक बेलखोडे यांची ओळख नव्हती, तर बाबा आमटेंचे मानसपुत्र अशीही डॉ. बेलखोडे यांची ओळख आहे.
आपलं सगळं काम आटोपून डॉक्टर माझ्याकडं आले. ”कसा पोहोचलास, येताना त्रास झाला का,” अशी अगदी पोटच्या पोरासारखी माझी विचारणा डॉक्टर करत होते. गप्पा झाल्या आणि रात्रीचं जेवणही आटोपलं. गप्पांची दुसरी फेरी आता सुरू झाली होती. साधारण दहा वाजले असतील, अचानकपणे खाली काम करणारे, दोन कम्पाउंडर वर पळत आले. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, “एक महिला आली आहे. तिला खूप त्रास होतोय. तुम्ही खाली चला.” डॉक्टर तसं तयारच होते. सेम बाबा आमटे यांच्यासारखा पोशाख… पांढरा शर्ट आणि गुडघ्यापर्यंत लांब चड्डी आणि विचारपण. घाईनं उठून डॉक्टर खाली जाण्यासाठी निघाले.
मीही डॉक्टरांबरोबर खाली गेलो. पाहिलं तर काय, एक वीस वर्षांची महिला, तिच्या कडेवर एक वर्षभराचं मूल असेल. पोटामध्ये वाढत असलेलं मूलही माझ्या लक्षात आलं. डॉक्टरांनी त्या महिलेला शांतपणे विचारलं, “काय झालं?” ती म्हणाली, “माझं पोट गेल्या महिन्याभरापासून दुखतंय. झाडपाला खाल्ला, महाराजला दाखवलं; पण काही फरक पडला नाही.” तिचा नवरा मध्येच म्हणाला, “साहेब, सकाळी त्रासानं अक्षरश: लोळत होती, म्हणून तिथून निघालो.” डॉक्टर रागावून त्या व्यक्तीला म्हणाले, “अहो, मग जेव्हा दुखायला लागलं, तेव्हाच आणायचं ना..!” तो काही न बोलता शांत बसला. डॉक्टर त्या महिलेला आतमध्ये घेऊन गेले. तिच्याकडं असलेलं लेकरू तिनं नवऱ्याजवळ दिलं. तो बिचारा एका कोपऱ्यात जाऊन बसला. मी त्याच्याजवळ गेलो, त्याला पिण्यासाठी पाणी दिलं आणि मी त्या व्यक्तीला विचारलं, “कुठून आलात तुम्ही?” त्यांनी सांगितलं, “मांजरी माथा.”
मी म्हणालो, “बरं…”
मी पुन्हा विचारलं, “कशानं आलात…” ते म्हणाले, “काही अंतर पायी, काही बैलगाडीनं आणि मग उरलेलं अंतर आम्ही काळीपिवळीनं कापलं.”
हा तीन प्रकारचा झालेला प्रवास… मला काही कळेचना. बाजूला असलेल्या कम्पाउंडरनं मला सांगितलं, “दवाखान्याच्या आसपास असणाऱ्या अनेक गावांमध्ये आजही पाऊलवाटच आहे, त्यामुळं दवाखान्यापर्यंत यायला लोकांना खूप वेळ लागतो.” मला धक्का बसला; आपण ज्या राज्यामध्ये राहतो, त्या राज्यामध्ये अनेक गावांत आजही पाऊलवाटच आहे, कच्चा रस्तापण नाही, हे माझ्यासाठी तसं धक्कादायकच होतं. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी त्या महिलेच्या नवऱ्याला सांगितलं, “मला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल.” त्यांनी आपल्या काही सहकारी डॉक्टरांना फोनाफोनी केली आणि तातडीनं बोलावून घेतलं. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या महिलेच्या पोटामध्ये असलेला अतिरिक्त मांसाचा गोळा, गर्भाला धक्का न लागू देता बाहेर काढला. डॉक्टर एकदम अनुभवी सर्जन आहेत.
त्या शस्त्रक्रियेचे काही फोटोग्राफ आणि व्हिडीओ डॉक्टरांनी मुद्दाम मला दाखवण्यासाठी काढले होते. त्या छोट्याशा ट्रेमध्ये ठेवलेला तो गोळा बघून माझ्या पोटामध्ये भीतीचा गोळा आला होता. तीन तासांनंतर डॉक्टर त्या महिलेच्या नातेवाइकांची व्यवस्था करून आले. माझ्याकडं बघता क्षणी ते मला म्हणाले, “अरे अजून जागा आहेस का तू?” मी म्हणालो, “हो, तुम्हाला असं कितीही वाजता पेशंटसाठी जावं लागतं का?” डॉक्टर म्हणाले, “अरे, हा खूप मोठा परिसर आहे. जंगल, दऱ्याखोऱ्यांत राहणारा हा सर्व आदिवासी समुदाय आहे.
आपला दवाखाना चोवीस तास सुरू असतो, त्यामुळं रुग्ण रात्रभरही सुरू असतात. शिवाय, अडलेल्या नडलेल्या बाळंतिणींचं तर विचारू नकोस. आपल्याकडं फार सुविधा नाहीत; पण तरीसुद्धा माणूस वाचला पाहिजे, बरा झाला पाहिजे, ही भावना मनात ठेवून आपलं काम सुरू आहे.” मी म्हणालो, “सर तुम्ही सगळं जमवता कसं? म्हणजे तुमच्याकडं येणारे बहुतांशी रुग्ण हे पन्नास रुपयेसुद्धा फी देऊ शकत नाहीत, असे असतात. त्यांचं ऑपरेशन, राहण्याची व्यवस्था, त्यांचं खाणंपिणं हे सगळं होतं कसं?”
डॉक्टर म्हणाले, “काही नाही, जसं १९९३ पासून सुरू आहे तसं. तुझ्यासारखे चार मित्र जमेल तशी मदत करतात आणि त्यातूनच हे सगळं चाललं आहे. बाबा आमटे यांनी दिलेली शिकवण डोळ्यांपुढं आहे. एक संस्था चालवण्यासाठी काय लागतं, इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा.” एक-एक विषय काढत डॉक्टर मला सांगत होते आणि मी थक्क होऊन ऐकत होतो. “या भागात आजही किनवटपासून आसपास पन्नास-साठ किलोमीटरवर कुठलाही डॉक्टर आपण सरकारी कामात चांगली सेवा द्यावी, या मानसिकतेमध्ये नसतो. का, तर आजूबाजूला सगळे अशिक्षित लोक असतात. चांगल्या शाळा-महाविद्यालयं नाहीत, दळणवळणाची सुविधा नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण इथं राहायचं कसं, असा प्रश्न या शिकलेल्या अनेक डॉक्टरांना, अधिकाऱ्यांना पडतो.”
मी मध्येच म्हणालो, “डॉक्टर, तुम्ही एवढा सगळा डोलारा उभा केलाय खरा; पण तुमच्या पश्चात हे चालवणार कोण?” हसून अगदी शांतपणे डॉक्टर म्हणाले, “माझ्यासोबत असलेली अनेक मुलं, ज्यांनी इथं खूप चांगलं काम होताना पाहिलं, अनुभवलं, जे माझ्या कामात सहभागी झाले होते, ते आता मेडिकल ऑफिसर होऊन इथं माझ्यासोबत काम करायला येत आहेत, त्यामुळं माझ्यानंतर काय, ही चिंता तशी दूर झाली आहे.” उत्साहात येऊन डॉक्टर म्हणाले, “एक हकिकत तुला सांगतो. माझ्याकडं एक नर्स काम करत आहे. त्या नर्सला मुलगी झाली आणि ती लहानाची मोठी आपल्याच घरात झाली.
माझ्या अंगाखांद्यांवर वाढली. इथल्या सगळ्या वातावरणानं तिच्यामध्ये आपसूकच डॉक्टर होण्याचं स्वप्न पेरलं. आम्ही लाडानं तिला पिलू पिलू म्हणायचो. आता ते पिलू म्हणजे वंदना लातूरच्या राजश्री शाहू कॉलेजमध्ये शिकते. ती म्हणते, मी डॉक्टर होऊन, तुमचा वारसा पुढं नेणार. तिला दहावीला ९२ टक्के मार्क मिळाले. असे अनेक जण आहेत, ज्यांनी माझं काम पाहिलं आणि इथं या आदिवासी लोकांसाठी, दीनदुबळ्या लोकांसाठी आपण काम करायचं, असं ठरवूनच आपलं करिअर करायला सुरुवात केली.” थोडं चिंताग्रस्त होत डॉक्टर म्हणाले, “मी वर्षाकाठी किमान बारा-पंधरा हजार रुग्णांची सेवा करत असेन. त्या रुग्णांकडून पैसे घ्यायचे कुठून? त्यांच्याकडं पैसा नसतोच. आता त्या सगळ्या रुग्णांची मला काळजी वाटू लागली आहे. कारण, माणूस वाचवण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या आपल्याकडं उपलब्ध होत नाहीत. ती साधनसामग्री घेण्यासाठी आपण हवा तेवढा पैसा उपलब्ध करू शकत नाही.”
वाचा l ‘या’ फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो, संजय राऊतांचा अमित शाहांना इशारा
मी मध्येच म्हणालो, “काय काय साधनसामग्री लागते डॉक्टर आपल्याला?” डॉक्टर जोरात निःश्वास सोडत म्हणाले, “तशी यादी खूप मोठी आहे रे बाबा. एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन, एनआयसीयू, व्हेंटिलेटर, आयसीयू, असं बरंच काही.” मी म्हणालो, “तुम्ही काही दाते शोधले नाहीत का?” ते म्हणाले, “शोधले… पण पुढं फार काही झालं नाही. दवाखान्याचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वास येत नाही. मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत कुठंही हलता येत नाही, इतके पेशंट इथं असतात. मी जे काम करतोय, ते सगळ्यांना माहीत आहे; पण तरीसुद्धा आपण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नाही,” असं काळजीपूर्वक डॉक्टर मला सांगत होते.
मी विचार करत होतो, ज्यांनी स्वतः लोकांची सेवा करण्यासाठी, या धगधगत्या कुंडामध्ये उडी घेतली, त्यांच्यासोबत नव्यानं जोडणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच का असावी? त्यांना मदत करण्यासाठी लोक पुढं का येत नाहीत? दर वर्षी किमान दोन हजार लोकांचे तरी डॉक्टर जीव वाचवत असतील. किमान दहा हजार लोकांना ठणठणीत बरं करून घरी पाठवत असतील. या गरीब लोकांना आपल्या दवाखान्यापर्यंत येता येत नाही, असं लक्षात आल्यावर डॉक्टरांनी माहूर, यवतमाळ, उमरखेड आणि तिकडं तेलंगणची सीमा अशा सगळ्या भागात फिरता दवाखाना सुरू केला… डॉक्टर कशाचा तरी विचार करीत होते.
मी डॉक्टरांना मोठ्या आवाजात म्हणालो, “या भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण तसं कमीच आहे ना…” डॉक्टर म्हणाले,
“ते अगदी खरं आहे. खूपच कमी. मी हाच विषय घेऊन उच्चशिक्षणाची सोय या भागात व्हावी, यासाठी शासनदरबारी इस्लामपूरला आपल्या संस्थेला कॉलेज द्या, अशी मागणी केली; पण तिथं मला सरकार, पक्ष आडवे आले. खूप दिवस सरकारच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढल्यावर आपल्याला कॉलेज मिळालं. आज गोरगरिबांची, दीनदलितांची मुलं इस्लापूरला, साने गुरुजी नावाच्या आपल्या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत.”
मला डॉक्टरांचं कौतुक वाटलं. तत्त्वं आणि मूल्यांवर चालणाऱ्या माणसांचा अनेक वेळा विजय कसा होतो, याचं डॉक्टरांचं कॉलेज प्रकरण हे उत्तम उदाहरण होतं. तो सगळा किस्सा मला डॉक्टरांनी सांगितला. डॉक्टरांकडं एवढे विषय होते, की ते ऐकायला रात्रही कमी पडली असती. गप्पांच्या ओघात रात्रीचे दोन कधी वाजून गेले, हे कळलंच नाही. मग गुड नाइट, आता झोपा, असं म्हणत डॉक्टर माझ्या पलीकडंच एक चटई टाकून झोपले. डोळे मिटल्या- मिटल्या कधी झोप लागली हे कळलं नाही. सकाळी गार हवा आणि पक्ष्यांच्या प्रचंड किलबिलाटामुळं मला सात वाजताच जाग आली. पाहतो तर काय, माझ्या आंगावर पांघरूण होतं. रात्री तर मी पांघरूण घेतलं नव्हतं. माझ्या एकदम लक्षात आलं, माझ्यावर पांघरूण घालायचं काम डॉक्टरांनी केलं होतं. तिथलं सगळं वातावरण पाहून मला एकदम, बाबा आमटेंच्या ‘आनंदवन’मध्ये आहे की काय, असा भास झाला.
आनंदवनसारखंच हे वातावरण होतं. मी उठून खाली पाहतो तर काय? रुग्णांची ये-जा सुरू झाली होती. बाहेर एक खुर्ची टाकून डॉक्टरांनी आपली ओपीडी सुरू केली होती. मी आनंदवनला अनेक वेळा डॉक्टरांसोबत होतो. केवळ वातावरणच नाही तर साने गुरुजी रुग्णालयामध्ये चालणारी सेवा बघून मला दोन्ही ठिकाणच्या मूल्यांत, संस्कारांतही साम्यता वाटत होती. बाबांनी दिलेल्या ”हाथ लगे निर्माण में, नही मांगने नही मारने”चा खरा प्रत्यय इथंही येत होता. एक मोठे सर्जन, समाजसेवक, अनेकांचे पालक एवढीच ओळख डॉक्टरांची नव्हती, तर बाबा आमटे यांचे मानसपुत्र अशी त्यांची ओळख अवघ्या सेवाभावी वातावरणाला आहे. किनवटमधलं ते काम प्रतिआनंदवनासारखं गेल्या कित्येक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. आता डॉक्टर वार्धक्याकडं झुकले आहेत, तरी त्यांच्यात पंचविशीतला उत्साह आजही कायम आहे.
पाहा l VIDEO आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला,उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना दणका
त्या दवाखान्यासाठी, त्या भागातल्या पीडितांसाठी आणि डॉक्टरांसाठी काय करता येईल, याचा विचार मनात ठेवून मी निघण्याच्या तयारीला लागलो. खरंतर तिथून माझा पाय निघत नव्हता. डॉक्टर म्हणाले, “अरे आलास तर राहा ना दोन दिवस, का गडबड करतोस?” मी शांतच होतो. मी ”पुन्हा येतो,” असं म्हणत डॉक्टर आणि साने गुरुजी रुग्णालयाच्या सर्व परिवाराचा निरोप घेतला.
शहराच्या थोडं पुढं गेल्यावर, मला अनेक महिला आपल्या डोक्यावर लाकडांचं ओझं वाहताना दिसत होत्या. त्या महिलांच्या अंगावर तसे पूर्ण कपडे नव्हतेच. त्या महिलांच्या वेशभूषेत, त्यांच्या कुपोषित अंगावरून मला आपल्या राज्याचं दारिद्य्र दिसत होतं. हे दारिद्य्र दूर करणं, राज्य निर्माण झाल्यापासून चोवीस मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला कधी का जमलं नाही? आणि बाबा आमटे, डॉ. अशोक बेलखोडे यांच्यासारखी माणसं आपल्या सेवाभावी वृत्तीनं काही तरी करण्यासाठी पुढं येतात; त्यांना ना कुठला समाज स्थान देतो, ना कोणतं सरकार… हे असं का, असा माझा मलाच प्रश्न पडला होता, ज्याचं उत्तर मिळत नव्हतं.
संदीप काळे
संपर्क – 9890098868