दुष्काळात एसटीची १५ टक्के भाडेवाढ टळली; दिवाळीत प्रवाशांना दिलासा!

१ ते १५ नोव्हेंबरदरम्यान भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

st-bus-fare-hike-rejected-diwali-2026
st-bus-fare-hike-rejected-diwali-2026

मुंबई:दुष्काळ, महागाई आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिवाळीत दिलासा मिळणार आहे. दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या प्रवासी भाड्यात १५ टक्के हंगामी वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावला. त्यामुळे १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रस्तावित असलेली भाडेवाढ होणार नाही.

दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही एसटी प्रशासनाने १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन सरनाईक यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.

आर्थिक भार प्रवाशांवर नको

एसटी महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असले, तरी त्याचा अतिरिक्त भार सर्वसामान्य प्रवाशांवर टाकणे योग्य नसल्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी घेतली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीची लालपरी हा प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढ झाल्यास त्यांच्या दैनंदिन खर्चात भर पडली असती.

दुष्काळामुळे आधीच अडचणीत असलेल्या कुटुंबांना आणखी आर्थिक झळ बसू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

तोटा भरून काढण्यासाठी पर्यायी उपायांचा विचार

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधण्याची गरज असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी नमूद केले. प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी सेवा देणे हे महामंडळाचे कर्तव्य असून, आर्थिक तोट्याची भरपाई करण्यासाठी थेट प्रवासी भाडेवाढीचा पर्याय स्वीकारणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे कर्तव्य आहे. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणार नाही,’ अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.

फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना काय फायदा? सरकारी योजनांपासून कृषी अनुदानापर्यंत महत्त्वाची माहिती एका क्लिकवर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here