आमदार नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही का? : अतुल लोंढे

Is there no threat of taking action against MLA Nitesh Rane in Maharashtra Police? : Atul Londhe
Is there no threat of taking action against MLA Nitesh Rane in Maharashtra Police? : Atul Londhe

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी: कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो, चिथावणीखोर भाषण देतो, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस आपले काहीच वाकडं करु शकत नाहीत, असे थेट पोलिसांना आव्हान देतो. महाराष्ट्र पोलिसांमध्ये नितेश राणेवर कारवाई करण्याची धमक नाही का? असा संतप्त सवाल करून राणेंवर कारवाई करण्याची हिम्मत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

भाजपा सरकारचा समाचार घेत अतुल लोंढे पुढे म्हणाले की, आमदार नितेश राणेंची भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आहे. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे म्हणूनही सागर बंगल्यावरचा हा बॉस कान, डोळे बंद करुन कुंभकर्णी झोप घेत आहे हे दिसते. सोलापुरच्या सभेत या आमदार नितेश राणेनी भडकाऊ भाषण दिले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण कारवाई काहीच झाली नाही. अकोल्यातील सभेतही आमदार नितेश राणेनी गरळ ओकली. “पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील, मी येथे आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणे मुश्कील होईल.” ही भाषा महिलांचा अपमान करणारी व थेट पोलिसांना आव्हान देणारी आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितेश राणेची ही भाषा मान्य आहे का? सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? या गुंडाछाप दोन कवडीच्या आमदारावर कारवाई करताना शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? आमदार नितेश राणेच्या भाषणावर भाजपाने भूमिका स्पष्ट करावी व त्यांना आवार घालण्याची हिम्मत दाखवावी.

भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मा. सुप्रीम कोर्टाने दिले आहेत परंतु भाजपाच्या राज्यात कायदा तर धाब्यावर बसवला आहेच पण कोर्टालाही ते जुमानत नाहीत, हा सत्तेचा माज आहे. आमदार नितेश राणेवर कारवाई करु नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे हे आम्हाला माहित आहे मग पोलिसांच्या लाठ्या व कायदा हा फक्त विरोधकांवर का उगारता? कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पोलिसांनी लक्षात घ्यावे. सरकार येतात व जातात परंतु पोलीस व प्रशासन यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले पाहिजे. “म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो” हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवावे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here