…तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकतो; राहुल गांधींचा इंडिया आघाडीच्या बैठकीत हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.

Congress-mp-rahul-gandhi-says-india-alliance-2-major-decisions-in-mumbai-meeting-seat-sharing-formula-news-update
Congress-mp-rahul-gandhi-says-india-alliance-2-major-decisions-in-mumbai-meeting-seat-sharing-formula-news-update

मुंबई: विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची (India Alliance) तिसरी बैठक आज (१ सप्टेंबर) मुंबईत पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच तीन ठराव मांडले. आजच्या बैठकीत इंडिया आघाडीने आगामी निवडणुकांसाठीची रणनीति तयार केली आहे. या बैठकीसाठी जमलेल्या २८ पक्षांच्या नेत्यांनी बैठक पार पडल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. आम्ही २८ पक्ष एकत्र आलो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला (BJP) पराभूत करू शकतो.

राहुल गांधी म्हणाले, या बैठकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचे मी आभार मानतो. आजच्या या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या. एक म्हणजे आम्ही इंडियाची समन्वय समिती गठित केली आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांबाबत राज्य स्तरावर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत.

राहुल गांधी म्हणाले, आत्ता या मंचावर जे नेते आणि वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, हे सर्वजण देशातल्या ६० टक्के लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आम्ही जर एकत्र निवडणूक लढलो तर भाजपा ती निवडणूक जिंकू शकत नाही. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, या सर्व पक्षांमध्ये घट्ट संबंध तयार होऊ लागले आहेत. मला वाटतं इंडिया आघाडी भाजपाला आगामी निवडणुकीत हरवू शकते.

इंडिया आघाडीने १४ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांचा समावेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोन नेते इंडियाच्या समन्वय समितीचे सदस्य आहेत.

समन्वय समितीमधील १४ सदस्य

के. सी, वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)

शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)

एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)

संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)

तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)

अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)

राघव चढ्ढा (आपचे खासदार)

जावेद खान (समाजवादी पक्ष)

लालन सिंग (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)

हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)

डी राजा (सीपीआय)

ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)

मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)

१४ व्या सदस्याच्या रुपात मार्क्सवादी कम्युनिट्स पार्टीच्या एका नेत्याचा समावेश केला जाणार आहे.

इंडियाच्या बैठकीत मांडलेले ठराव

१. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया ताबडतोब सुरू केली जाईल आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

२. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेणार आहेत.

३. इंडियामधील पक्ष विविध भाषांमधून ‘जुडेगा भारत, जीतेगा भारत’ या इंडियाच्या मोहिमेचा प्रचार आणि प्रसार करतील

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here