राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण त्रस्त आणि शिंदे सरकार मात्र देवदर्शनात व्यस्त

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

atul londhe criticize Farmers of the state, unemployed youth are suffering and Shinde government is busy with Devdarshan
atul londhe criticize Farmers of the state, unemployed youth are suffering and Shinde government is busy with Devdarshan

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे, बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत सरकारकडे आशेने पाहत आहे आणि शिंदे सरकार मात्र सरकार वाचावे यासाठी देवदर्शनात व्यस्त आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (Congress Spokesperson) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकाऱ्यांच्या गुवाहाटी पर्यटनावर टीका करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळत नाही, नोकरीची आस लावून बसलेल्या तरुणांसाठी नोकर भरती केली जात नाही. सामान्य जनता महागाईत होरपळत आहे.

राज्यातील प्रकल्प भाजपाशासित शेजारच्या राज्यात जात आहेत तर दुसरीकडे शेजारचे कर्नाटक राज्य सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातलील ४० गावांवर हक्क सांगत आहे. समस्यांचा डोंगर राज्यासमोर उभा असताना मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी सरकारी पैशावर देवीचा नवस फेडण्यासाठी खास सुविधांसह पर्यटनयात्रा करत आहेत हा संताप आणणारा प्रकार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पर्यटन करून ५० खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राच्या जनतेचा घात केला. ५० खोके, ओके म्हणत असाल पण राज्यात सर्वकाही ओके नाही. ५० खोक्यांवरून तुमच्याच आमदारांमध्ये वाद जुंपल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.

कधी गणशोत्सव मंडळांना भेटी देण्यात व्यस्त तर कधी नवरात्रोत्सवात व्यस्त, परत सरकार वाचेल का नाही ह्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवण्याचा प्रकार यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ आहे पण जनतेच्या प्रश्नांसाठी वेळ नाही. देवीचा नवस फेडा, नाहीतर ज्योतिष्याला हात दाखवा पण या असंवैधानिक सरकारचे भविष्य न्यायालयाच्या हातात आहे आणि तेथे कोणताही नवस किंवा भविष्य कामाला येत नसते हे लक्षात ठेवावे, असेही लोंढे म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here