Dhananjaya y chandrachud : सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठीचा डंका! धनंजय चंद्रचूड देशाचे पुढचे सरन्यायाधीश

देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे.

cji-uu-lalit-names-d-y-chandrachud-as-his-successor-as-chief-justice-of-india-news-update-today
cji-uu-lalit-names-d-y-chandrachud-as-his-successor-as-chief-justice-of-india-news-update-today

नवी दिल्ली: देशाचे सरन्यायाधीश उदय लळित (Uday lalit Chief Justice of India) यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड (Dhananjaya y chandrachud) यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ललीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवलं. धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश होते.

लळित ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली.

धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

 न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड कोण आहेत?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याचं पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कुलमधून घेतली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.

१९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी चंद्रचूड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here