बारामुल्ला : भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) सध्या जम्मू काश्मीरच्या (jammu Kashmir) दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी बारामुल्ला जिल्ह्यातील एका सभेला संबोधित केलं. दरम्यान, भाषण सुरु असतानाच जवळच्या मशिदीत अजान सुरु झाल्याने अमित शाह यांनी काही वेळासाठी आपलं भाषण थांबवलं. यानंतर उपस्थितांनीही अमित शाह यांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. अमित शाह यांच्या सभेतील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील शौकत अली स्टेडियममध्ये अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच मशिदीतून आवाज येऊ लागला. अमित शाह यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना “मशिदीत काही सुरु आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर त्यांना अजान सुरु असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर अमित शाह यांनी आपलं भाषण थांबवलं.
जम्मू काश्मीरमधील सभेदरम्यान अजान ऐकताच अमित शाह यांनी थांबवलं भाषण, लोकांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक #AmitShah #JammuAndKashmir #Baramulla @BJP4India @AmitShahOffice @AmitShah pic.twitter.com/GK0SX8gfbc
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) October 6, 2022
अजान संपल्यानंतर त्यांनी लोकांना भाषण पुन्हा सुरु का? असं विचारलं. ते म्हणाले “जवळच्या मशिदीमध्ये प्रार्थना सुरु होणार असल्याचं मला एका चिठ्ठीद्वारे समजलं. आता प्रार्थना संपली आहे. पुन्हा भाषण सुरु करतो. चालेल ना?”. यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक केलं. दरम्यान, भाषणाला सुरुवात करण्याआधी त्यांनी तासाभरापासून जास्त वेळ वाट पाहणाऱ्या लोकांचे आभार मानले.