Sanjay Raut : संजय राऊतांची पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून १० तास चौकशी

Shivsena-mp-sanjay-raut-on-pankaja-munde-statement-about-bjp-party-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-on-pankaja-munde-statement-about-bjp-party-news-update-today

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी सुमारे  १० तास चौकशी केली. यावेळी त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या १ हजार ३९ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

ईडीने राऊत यांना समन्स बजावून १ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास ते ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयात हजार झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना आपला पत्राचाळ गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तपासाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 यापूर्वी राऊत यांनी समाज माध्यमांवर ईडी कार्यालयाबाहेर कोणीही जमा होऊ नये, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. राऊत यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवला होता. रात्री १० च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी चौकशीला सहकार्य केले आहे. जी उत्तर हवी होती, ती दिली आहेत. अजून हवी असतील किंवा पुन्हा बोलावले, तर पुन्हा येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, राऊत यांना पुन्हा चौकशीला बोलवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शनवर ६७२ भाडेकरूंना कोणतीही घरे न देता १ हजार ३९ कोटी ७९ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

ईडीेने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता एचडीआयएलकडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे १०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही रक्कम पुढे प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली.

२०१० मध्ये गुन्ह्यातून  मिळालेल्या रकमेपैकी ८३ लाख रुपये प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊत यांची पत्नी पत्नी  वर्षां राऊत यांना मिळाल्याचेही उघड झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here