Voice of Media : ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश

Inclusion of electronics, digital, radio establishments in labor journalist category
Inclusion of electronics, digital, radio establishments in labor journalist category

मुंबई : प्रिंट मीडियाप्रमाणे आता ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंगळवार, ३० मे २०२३ रोजी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या साठी वर्षभर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने (Voice of Media) आंदोलन केले होते.

ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांमधील पत्रकारांच्या विंग ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या छत्राखाली तयार करण्यात आल्या होत्या. या विंगच्या वेगवेगळ्या बैठकींचे आयोजन करीत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना श्रमिक पत्रकारांचा दर्जा देण्याची मागणी करणारा ठराव पारीत करण्यात आला होता. हा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या मुद्द्यावर पाठपुरावा केला होता. ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकारांच्या श्रेणीत समावेश करावा, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने शिंदे-फडणवीस सरकारकडे केली होती.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेकडुन सातत्याने होणारा पाठपुरावा बघता केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने राज्यात नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहे. त्याअनुषांगाने राज्यातील ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल मीडिया, रेडिओ या आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

आनंद आणि आभाराचा क्षण

पत्रकारांसाठी सुरू केलेल्या लढ्याला मिळालेले हे मोठे यश आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक समस्या आतापर्यंत सोडविण्यात आल्या आहेत. राज्यात ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल मीडिया, रेडिओ आस्थापनांना श्रमिक पत्रकारांच्या वर्गवारीत समाविष्ट केल्याबद्दल आनंद आणि सरकारचे आभार.

– संदीप काळे
सं‌स्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया

नव्या क्रांतीची नांदी

बदलत्या काळानुसार नव्या क्षेत्रातील पत्रकारांचा प्रवाहात समाविष्ट करू घेणे गरजेचे होते. त्यानुसार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने उभारलेल्या लढ्याला आता यश मिळाले आहे. त्याबद्दल सरकार आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आभार.

– विलास बढे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
टीव्ही विंग, व्हॉईस ऑफ मीडिया

रेडिओ क्षेत्राला न्याय मिळाला

स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७५ वर्षांपासून रेडिओ माध्यमातील लोकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासंदर्भात एक लढा उभारला आणि रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींना पत्रकार दर्जा प्राप्त झाला. याबद्दल सरकारचे आभार आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सामूहिक प्रयत्नांच्या यशाबद्दल आनंद वाटतो.

– इरफान सय्यद
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया, रेडिओ विंग

डिजिटल युगाचा प्रारंभ

डिजिटल मीडियातील पत्रकारांना आतापर्यंत कोणतीही मान्यता नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासंदर्भात आवाज बुलंद केल्यानंतर आता सरकारने त्यांना श्रमिक पत्रकारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याचे हे मोठे यश आहे.

– जयपाल गायकवाड
अध्यक्ष, डिजिटल मीडिया विंग
व्हॉईस ऑफ मीडिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here